उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसींचादेखील तुटवडा जाणवू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिदिन ४ हजार जणांना लस दिली जात आहे. आरोग्य विभागाकडे सध्या ८ हजार डोस उपलब्ध आहे. हा साठा दोन दिवस पुरेल इतकाच असून दोन दिवसात लसीचा पुरवठा न झाल्यास जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची केंद्रांकडे धाव वाढू लागली आहे. त्यामुळे दोन दिवसांत लसीकरणाचा आवश्यक साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य विभागातील डॉक्टर्स कर्मचारी यांना लस देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विविध संस्थांनी त्यांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. आता ४५ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता लसीकरण केंद्रही वाढविण्यात आले आहेत. प्रतिदिन ४ हजाराच्या जवळपास व्यक्तींना लस टोचली जात आहे.
कोट...
३६ हजार लसीची मागणी
जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे. शुक्रवारी ९३ पैकी ५३ केंद्रावर लसीकरण मोहीम पार पडली. लसीकरणात खंड पडू नये, याकरिता मागील आठवड्यात ३६ हजार डोस ची मागणी केली आहे. रविवारी लस मिळण्याची शक्यता आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ८५३९ ४५३९
फ्रंटलाईन वर्कर ११६४९ २७०२
६० वर्षापुढील नागरिक ३२९९७ ९६२
४५ वर्षापुढील दुर्धर आजाराचे रुग्ण १२७९१ ५६९
४५ ते ६० वयोगटातील नागरिक ४५७८८ १५३१
एकूण ६५९७६ ८७८२