कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे शाळा, काॅलेजस बंद झाली. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला घेऊन पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र, अभ्यासक्रमासाठी मोबाइलचा अतिवापर अंगलट येत असल्याचे समोर येत आहे. सात महिन्यांपासून ऑनलाइन तासिका, शैक्षणिक ॲपचा वापर प्रतिदिन वाढू लागला आहे. शिवाय यातून काही वेळ मिळताच विद्यार्थी गेम खेळण्यात व्यस्त होत आहेत. मोबाइल स्क्रिनिंग टाइम वाढत असल्याने त्याचा ताण डोळ्यांवर पडत आहे. परिणामी ५ ते १६ वयोगटातील मुलांमध्ये डोळ्यांत जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी गळणे, डोळे लाल होणे, असे त्रास जाणवू लागले असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.
अति ताण पडत असल्याने मुलांना अंधुक दिसू लागल्याच्या तक्रारी वाढल्याने चष्मा लागत आहे. ज्या मुलांना अगोदरच चष्मा लागलेला आहे. त्या चष्माचेही नंबरही वाढत आहेत.
ऑनलाइन शिक्षण प्रणाली लाॅकडाऊन काळात उपयुक्त ठरली असली तरी अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येत आहे. त्यामुळे ५ वयोगटापर्यंतच्या मुलांना दिवसातील १ तासच स्क्रिनिंग टाइम देणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.
मोबाइलवरचे शिक्षण संपल्यावर मुलांकडून लगेच मोबाइल काढून घेतले पाहिजे. त्यांना मोबाइलचे व्यसन लागू नये याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे. आपला पाल्य ऑनलाइन शिक्षण घेत असताना तो अभ्यासच करत आहे का, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
ऑनलाइन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे, अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येतो; पण त्यांना डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मुलांचे डोळे लाल होणे, उन्हाकडे पाहू न शकणे, चष्म्याचा नंबर वाढणे, अंधारी येणे अशा प्रकारचे त्रास हाेत आहेत.
अतिवापर धोक्याचा
जास्त स्क्रिन टाईम झाल्याने डोळे लाल होणे, जळजळ होणे, चष्म्याचा नंबर वाढणे आदी समस्या निर्माण होत आहेत. ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना १ ते २ तास स्क्रिन टाईम देणे गरजेचा आहे. ऑनलाइन क्लासबरोबरच सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे.
डॉ. आर. यू. बोराडे, बालरोगतज्ज्ञ
मुले दिवसभर मोबाइलवरच असतात. मोबाइल हाताळल्याने त्यांना रात्री लवकर झोपही येत नाही. पुस्तके वाचताना कंटाळा करीत आहेत. ऑनलाइन अभ्यासापेक्षा शाळेतील अभ्यासच चांगला आहे. मोबाइलपासून दूर ठेवण्याकरिता मुलांना इतर कामांत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश वाघमारे, पालक.