- संतोष वीरभूम (जि. धाराशिव): तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शिवाराची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी दौरा केला. “शेतकऱ्यांची यात कसलाही चूक नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे. यात कितीही मोठे नुकसान झाले तरी शासन याची तातडीने दखल घेऊन मदत करणार आहे'', असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
या दौऱ्यात अजित पवार यांनी चिंचोली येथे नगर रोडलगत वड्याचे पाणी राहत्या शेडमध्ये घुसून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या देवनाबाई नवनाथ वारे यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी चुबळी, गोरमाळा व वालवड येथे पाझर तलाव फुटून झालेल्या शेतीचे नुकसान आणि पाटसांगवी येथील फुटलेल्या तलावाची पाहणी केली.
दरम्यान, पिकांचे, जमिनीचे, विहिरीचे, पशुधनाचे तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून कोणालाही मदतीतून वगळले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “पंचनामे शासनाकडे आल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
या पाहणी दौऱ्यात आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, महेंद्र धायगुडे, सुरेश बिराजदार, सुरेश पाटील, दिग्विजय शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, रामराजे साळुंके, आबासाहेब मस्कर, संजय पाटील आरसोलीकर, हनुमंत पाठूळे, मधुकर मोटे, रणजित मोटे यांसह मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते.