घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:03 IST2025-10-14T19:00:47+5:302025-10-14T19:03:51+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तोही रोहित पवार यांच्या सांगण्यावरून उठवण्यात आला.

घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
धाराशिव : मला पाडण्यासाठी रोहित पवारांनी घायवळ यास पहिल्यांदा जामखेडला आणले. त्यांच्या अनेक बैठका झाल्या. नंतर त्यांच्यात काय बिनसले ठाऊक नाही. मात्र, मोक्कातून सुटका, पासपोर्ट त्यांच्याच काळात झालेल्या आहेत, असा गौप्यस्फोट सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी कळंब येथून केला.
प्रा. राम शिंदे हे मंगळवारी कळंब येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, २०१९ मध्ये मला पाडण्यासाठी घायवळ व रोहित पवार यांच्या वडिलांच्या अनेक बैठका झाल्या. यानंतरच्या काळात त्यांच्यात रिअल इस्टेट किंवा अन्य कोणत्या व्यवहारातून बिनसले हे माहीत नाही. मात्र, माझा घायवळ सोबत दूरदूरचा संबंध नाही.
रोहित पवारांनी मोक्का उठवला
घायवळच्या मामाने सांगितले आहे की, त्याचा पासपोर्ट रोहित पवार यांच्या मदतीने २०२० सालीच देण्यात आला आहे. त्यावेळी आघाडीचे सरकार होते. उलट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तोही रोहित पवार यांच्या सांगण्यावरून उठवण्यात आला. शस्त्र परवाना देण्यावरून इतके रान उठवले जात आहे, प्रत्यक्षात तो दिला गेला नाही. पवार व घायवळ यांच्यातील शपथांमध्ये अंतर आले असेल, म्हणून ते असे आरोप करीत असतील. मात्र, या प्रकरणात तेच तोंडघशी पडले आहेत, असा दावाही राम शिंदे यांनी केला.