"लय शायनिंग मारतो का?" म्हणत हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला तिघांनी स्टंपने झोडपले, चापटांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:09 IST2025-12-24T13:07:55+5:302025-12-24T13:09:22+5:30
येरमाळा पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; कॉलेजमधील 'शायनिंग' वादाला हिंसक वळण.

"लय शायनिंग मारतो का?" म्हणत हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला तिघांनी स्टंपने झोडपले, चापटांचा वर्षाव
येरमाळा (जि. धाराशिव): कॉलेजमध्ये तू खूप 'शायनिंग' मारतो आणि 'छाती बाहेर काढून चालतो', अशा शुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याला त्याच्याच सहकाऱ्यांनी लाकडी स्टंप, लोखंडी हँगर आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उक्कडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तीन आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध मारहाण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. जखमी विद्यार्थी प्रशिक बनसोडे हा या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत आहे. मंगळवारी अमर कोंढारे, यश मारकड आणि सौरभ समुद्रे या तीन विद्यार्थ्यांनी प्रशिकला गाठले. "तू कॉलेजमध्ये लय शायनिंग मारतो, छाती बाहेर काढून का चालतो?" असा जाब विचारत त्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
क्रूरतेचा कळस
आरोपींनी केवळ हातबुक्क्यांनीच नाही, तर ५० ते ६० चापटा मारून प्रशिकचा चेहरा सुजवला. इतक्यावरच न थांबता त्यांनी जवळ पडलेले लाकडी स्टंप, लोखंडी हँगर आणि काठीने त्याला ठिकठिकाणी मारहाण केली. या हल्ल्यात प्रशिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर जखमांचे वळ उठले आहेत.
पोलिसांची कारवाई
या भीषण प्रकारानंतर जखमी प्रशिक बनसोडे याने येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अमर कोंढारे, यश मारकड व सौरभ समुद्रे यांच्यावर मारहाण, शिवीगाळ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार करत आहेत.