सुविधा बंद करून नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:40+5:302021-03-27T04:33:40+5:30
तुळजापूर : शहरातील पूर्वीच्या कचराकुंड्या, शौचालये व मुतारी पाडून शहरवासीयांची गैरसोय निर्माण करणाऱ्या पालिकेतील मुख्याधिकारी व नगरसेवकांची चाैकशी करून ...

सुविधा बंद करून नागरिकांची गैरसोय
तुळजापूर : शहरातील पूर्वीच्या कचराकुंड्या, शौचालये व मुतारी पाडून शहरवासीयांची गैरसोय निर्माण करणाऱ्या पालिकेतील मुख्याधिकारी व नगरसेवकांची चाैकशी करून कारवाईची मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांमार्फत नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरी ही गैरसोयीचे माहेरघर बनले आहे. शहराची लोकसंख्या साधारण ३५ ते ४० हजार असून, येथे दररोज कमीतकमी साधारण ४० ते ५० हजार भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. त्या सर्व भाविकांना, स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा देण्याचे कर्तव्य हे नगरपालिकेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहरात कुठल्याच भागात सुलभ शौचालय, कचराकुंडी व मुतारी दिसून येत नाहीत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या घरासमोरील सुरू असणाऱ्या कचराकुंडी, शाैचालय व मुताऱ्या विनापरवाना पाडून टाकल्या आहेत. याबाबतची चौकशी केली तर उडवाउडवीचे उत्तरे नगर प्रशासनाकडून दिली जातात.
नगरपरिषदेने पूर्वीच्या ठिकाणी व नवीन ठिकाणीही या सुविधा पुरविताना दिसून येत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या देवीभक्तांची, नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात आवश्यक तेथे सर्व्हे करून वरील सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात, अन्यथा या मुलभूत गरजांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर प्रमोद कदम-परमेश्वर, अक्षय साळवे, उमेश कांबळे, सूरज कोठावळे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.