कळंब-लातूर मार्गावर भीषण अपघात! भरधाव वाहनाने ७ उसतोड मजुरांना उडवले, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:16 IST2025-12-22T18:13:59+5:302025-12-22T18:16:12+5:30
या अपघातामुळे उसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कळंब-लातूर मार्गावर भीषण अपघात! भरधाव वाहनाने ७ उसतोड मजुरांना उडवले, दोघे गंभीर
- बालाजी अडसूळ
कळंब (धाराशिव): कष्ट उपसून घामाचे दाम मिळवण्यासाठी निघालेल्या उसतोड कामगारांच्या आयुष्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. कळंब-लातूर राज्यमार्गावरील खडकी शिवारात एका अज्ञात वाहनाने रस्त्याकडेला थांबलेल्या ७ ऊसतोड मजुरांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हावरगाव येथील साखर कारखान्यासाठी शंकर डोंगरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. मंगरूळ येथील हे मजूर काम संपवून सोमवारचा आठवडी बाजार करण्यासाठी कळंबला जाण्याच्या तयारीत होते. ऊसाचा ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना करून हे सर्वजण रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहत उभे होते. मात्र, काळाने वेगळ्याच रूपाने घाला घातला आणि भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.
अतुल साहेबराव पवार ३० वर्षे, नेताजी मोतीराम पवार ३५, इश्वर प्रभू पवार ३३ वर्षे, ताई सुरेश पवार ४५, प्रभू मुरली पवार ५०, जनाबाई प्रभू पवार ४३, शिवाजी मोतीराम पवार ४० वर्षे हे उसतोड कामगार अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. नागनाथ धर्माधिकारी आणि डॉ मनोजकुमार कवडे, डॉ सुधीर आवटे, डॉ पुरूषोत्तम पाटील, डॉ प्रशांत जोशी, डॉ स्वप्निल शिंदे, डॉ शरद शिंदे, डॉ मिरा कस्तुरे व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.