खत-बियाण्यांची साठेबाजी पडली महागात! धाराशिवमध्ये ४ दुकानांचे परवाने रद्द, तिघांना ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:06 IST2025-09-12T12:02:37+5:302025-09-12T12:06:31+5:30
रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून अचानक भेटी देऊन कृषी सेवा केंद्रांची झडती घेण्यात येत आहे.

खत-बियाण्यांची साठेबाजी पडली महागात! धाराशिवमध्ये ४ दुकानांचे परवाने रद्द, तिघांना ताकीद
धाराशिव : खत-बियाणांची साठेबाजी करणे तसेच कृषी विभागाने घालून दिलेल्या इतरही नियमांची पायमल्ली करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ७ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ४ केंद्रावर गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर इतर तिघांना ताकीद देण्यात आल्याची माहिती गुरुवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी दिली.
रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून अचानक भेटी देऊन कृषी सेवा केंद्रांची झडती घेण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या झडत्यांमध्ये ई-पॉस मशीनप्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्रोतांकडून खरेदी-विक्री करणे, साठा रजिस्टरमध्ये नोंद नसणे, शेतकऱ्यांना विहित नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिले नसणे, परवान्यात गोदामाचा समावेश नसणे, अशा अनियमितता आढळून आल्या आहेत. याअनुषंगाने जिल्ह्यातील ७ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या केंद्रांमध्ये धाराशिव तालुक्यातील २, लोहारा १, भूम १, परंडा १ व वाशी तालुक्यातील २ सेवा केंद्रांचा समावेश आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, तपासणी यापुढेही सुरूच राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे, खते व कीटकनाशके कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
खरीप हंगामात ४३ कारवाया
यापूर्वीही खरीप हंगाम सुरू होत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून कृषी सेवा केंद्राच्या अचानक तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनियमितता आढळून आलेल्या जिल्ह्यातील ४३ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती.
शेतकऱ्यांनो नुकसान टाळण्यासाठी हे करा
१. कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवानाधारक सेवा केंद्रातूनच खरेदी करावी. खरेदीवेळी पक्की पावती घेऊन त्यावरील तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी तपासावी.
२. अनुदानित खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरून मिळणारे बिल घ्यावे. खताच्या पिशवीवरील किंमत व बिलातील दर तपासावा.
३. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व टॅग, पिशवी, थोडे बियाणे हंगामभर जतन करावे.
४. नामांकित कंपनीचेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. के. आसलकर यांनी केले आहे.