धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पाथरुड-आंबी भागात पूर, अनेक घरांत पाणी शिरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:33 IST2025-09-27T10:32:57+5:302025-09-27T10:33:24+5:30
ठीकठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पाथरुड-आंबी भागात पूर, अनेक घरांत पाणी शिरले
पाथरुड (जि. धाराशिव) : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून पाथरुड-आंबी परिसरासह संपूर्ण भूम तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे या भागातील नद्यांना प्रचंड मोठा पूर आला असून, नद्यांनी आपली पात्रे सोडून धोकादायकरीत्या पाणी रस्त्यांवरून आणि घरांमध्ये शिरले आहे.
नागरिकांचे हाल आणि वाहतूक ठप्प...
नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे पाथरुड-ईट आणि पाथरुड-आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. विशेषतः, अनेक ठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...
सतत सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, हातातोंडाशी आलेले पीक वाहून जाण्याची किंवा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. या मोठ्या नुकसानीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.