बोअरची मोटर काढताना शॉक लागून चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:49 IST2025-12-28T09:48:59+5:302025-12-28T09:49:54+5:30
कप्पी घटनास्थळावरील उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळल्याने त्यावर काम करीत असलेल्या चौघांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बोअरची मोटर काढताना शॉक लागून चौघांचा मृत्यू
दयानंद काळुंखे -
अणदूर (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील एका शेतकऱ्याच्या बोअरची बिघडलेली मोटार बाहेर काढताना शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. कप्पी घटनास्थळावरील उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळल्याने त्यावर काम करीत असलेल्या चौघांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
केशेगाव शिवारातील दुर्घटनेत शेतकरी नागनाथ काशीनाथ साखरे (वय ५६), रामलिंग नागनाथ साखरे (३०), तर मजूर म्हणून काम करणारे काशिम कोंडाजी फुलारी (४७), रतन काशिम फुलारी (१६) यांचा मृत्यू झाला. यातील नागनाथ साखरे व रामलिंग साखरे हे बापलेक तर, काशिम फुलारी व रतन फुलारी हेही दोघे बापलेक होते. केशेगाव येथील नागनाथ साखरे यांच्या शेतात दोन्ही बाजूने उच्चदाब वीजवाहिनी गेली आहे. या वाहिनीशेजारी असलेल्या बोअरमधील बिघाड झालेली मोटार काढण्यासाठी शनिवारी दुपारी उपरोक्त चौघेही क्रेनच्या कप्पीवर काम
करीत होते.
कप्पी वाहिनीवर कोसळली
कप्पीचा अचानक तोल गेल्याने ती खाली पडून नुकसान होऊ नये, यासाठी चौघांनीही त्यास सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कप्पी उच्चदाब वाहिनीवर कोसळली. यावेळी चौघांनाही जबर विद्युत शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
ही घटना कळताच नळदुर्ग ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे, कर्मचारी एस. ए. कोळी, महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रतीक खापरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.