धाराशिव जिल्हा परिषदेत कंत्राट मिळवण्यासाठी 'बनावटगिरी'; कंत्राटदारावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:41 IST2025-10-11T17:39:14+5:302025-10-11T17:41:37+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक; धाराशिव जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गंडा

धाराशिव जिल्हा परिषदेत कंत्राट मिळवण्यासाठी 'बनावटगिरी'; कंत्राटदारावर गुन्हा
धाराशिव : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात कंत्राट आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंत्राटदाराविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात १० ऑक्टाेबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नवनाथ कोकाटे (रा. निपाणी, ता. भूम) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता विवेकराज विलासराव वायचळ यांनी यासंदर्भात आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी रमेश कोकाटे याने २०२० ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषद बांधकाम विभागात कंत्राटदार प्रमाणपत्रे आणि कंत्राट मिळवण्यासाठी आवश्यक असलेले 'वर्क डन ॲन्ड वर्क इन हॅड' ही बनावट प्रमाणपत्रे आणि बनावट अभिलेख सादर केले.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी आरोपी रमेश नवनाथ कोकाटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शासकीय कामांमध्ये बनावटगिरी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.