तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:14 IST2025-09-30T14:09:15+5:302025-09-30T14:14:06+5:30
याबाबत रात्री उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास
धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या तेलंगणातील एका वरिष्ठ महिला न्यायाधीशांनाच चोरट्यांनी लक्ष्य केले. रविवारी सायंकाळी ७ वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण घेत असताना चाेरट्यांनी त्यांच्या कारमधून ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रात्री उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तेलंगणातील जहिराबाद शहरातील वरिष्ठ न्यायाधीश कविता देवी पर्णचंद्राराव गंटा (४८) या २८ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनानिमित्त तुळजापुरात आल्या होत्या. दर्शन आटोपल्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्या शहरातीलच अशोक हॉटेल येथे जेवणासाठी थांबल्या होत्या. दरम्यान, कारमध्ये कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी काच फोडून आत ठेवलेली एक बॅग व एका हँडबॅगमध्ये ठेवलेला ऐवज चोरून नेला. त्यात १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख ३५ हजार रुपये, नवीन कपडे, अशा ऐवजाचा समावेश आहे.
जेवण करुन न्या. कविता देवी या बाहेर आल्यानंतर चोरीची ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तुळजापूर ठाणे गाठून रात्री तक्रार दिली असून, त्यात ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून तुळजापूर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.