वीजबिल, थकीत करावरून पालिका, महावितरण आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST2021-03-26T04:33:02+5:302021-03-26T04:33:02+5:30

कळंब : नगर परिषदेकडे पथदिव्यांची थकबाकी असल्याच्या कारणावरून वीज वितरण कंपनीने शहरातील पथदिव्यांची वीज गूल केल्यानंतर आता न. प. ...

Electricity Bill, Corporation due to overdue tax, MSEDCL face to face | वीजबिल, थकीत करावरून पालिका, महावितरण आमनेसामने

वीजबिल, थकीत करावरून पालिका, महावितरण आमनेसामने

कळंब : नगर परिषदेकडे पथदिव्यांची थकबाकी असल्याच्या कारणावरून वीज वितरण कंपनीने शहरातील पथदिव्यांची वीज गूल केल्यानंतर आता न. प. प्रशासनानेही वीज कंपनीला विविध करांची जवळपास ३ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही कार्यालये आमनेसामने उभी ठाकल्याचे चित्र आहे.

वीज वितरण कंपनीने सध्या शहरासह तालुक्यात जोरदार वसुली मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये शासकीय थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने तेथेही सक्तीने कार्यवाही केली जात आहे. कळंब न.प.कडे पथदिव्यांच्या बिलापोटी मोठी रक्कम थकल्याने वीज कंपनीने शहरातील सार्वजनिक विद्युत व्यवस्थेची वीज बंद केली आहे.

याबाबत न.प.ने वीज कंपनीकडे पथदिव्यांचे थकीत बिल द्या, आम्ही बिल भरू, अशी भूमिका घेतली. परंतु, कंपनीकडून फक्त फेब्रुवारी २०२१ चेच बिल देण्यात आले, असे न.प. प्रशासनाकडून सांगण्यात आले. न.प.ने नोव्हेंबर २०२० पर्यंतचे बिल भरले आहे, इतर बिले मिळालीच नाहीत, तर द्यायची कशी, असा प्रश्न विचारूनही वीज कंपनी काहीच उत्तर द्यायला तयार नाही.

त्यामुळे नगर परिषदेनेही आता वीज कंपनीकडे २००५ पासूनची विविध करापोटीची थकबाकी काढली आहे. तो आकडाही जवळपास ३ कोटींच्या घरात गेल्याचे समोर आले आहे. तो कर भरा अन्यथा कार्यवाही करू, असा इशाराही न. प. प्रशासनाने या नोटिसीद्वारे दिल्याने करप्रकरणी तसेच वीजबिलप्रकरणी न.प. व वीज कंपनी आमनेसामने उभी ठाकल्याचे चित्र आहे.

चौकट -

वीज तोडल्याने नगराध्यक्षा आक्रमक

वीज वितरण कंपनीकडून नगर परिषदेची होत असलेली अडवणूक थांबवा अन्यथा कंपनीविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, कळंब न.प. ही ‘क’ वर्ग नगर परिषद आहे. मागील एक वर्षापासून कोरोना संसर्गामुळे करवसुली ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत आहेत. अशी परिस्थिती असतानाही न.प.ने पाणीपुरवठा योजनेची ८१ लाख रुपये वीजबिलाची रक्कम २० मार्च रोजी जमा केली. यानंतर वीज कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच वीज बिलही न देता पथदिव्यांची वीज तोडणी करून शहराला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोळा वर्षांपासून नळांचा वापर

नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्यांची वीज थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीने खंडित केल्यानंतर न.प.नेही आता वीज कंपनीकडे ३ कोटींच्या घरातील थकबाकी भरा, अन्यथा कार्यवाहीस सामोरे जा, असा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे.

वीज वितरण कंपनी अनधिकृतरीत्या सोळा वर्षांपासून दोन नळ कनेक्शनचा वापर करीत असल्याचे नमूद करून मंगळवारी न.प.ने पंचांसमक्ष पंचनामा करून गुरुवारी बिल मागणी सादर केली. एका नळ कनेक्शनचे १ कोटी ४७ लाख ९१ हजार ९०१ रुपयांप्रमाणे दोन नळ कनेक्शनचे २ कोटी ९५ लाख ८३ हजार ८०२ रुपयांचे बिल सात दिवसांत भरणा न केल्यास कलम १५२ प्रमाणे कारवाईची नोटीसही न.प.ने बजावली आहे.

याव्यतिरिक्त मालमत्ता कराचे १ लाख ६७ हजार, अधिक व्याज व जुनी थकीत जकातीची बाकी तसेच एक अधिकृत नळ कनेक्शनचे मीटर रिडिंगप्रमाणे बिल थकीत असल्याचेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचीही थकबाकी जमा करण्याचे न.प.ने कळविले आहे.

चौकट -

वीज कंपनीच्या भूमिकेचा सस्पेन्स !

या प्रकरणी वीज कंपनीची काय भूमिका आहे, याची माहिती घेण्यासाठी वीज कंपनीचे शहर अभियंता वैभव गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पथदिव्यांची थकबाकी किती? न.प.च्या नोटिसीला काय उत्तर देणार? आगामी काळात पथदिवे चालू होतील का? आदी प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाहीत.

Web Title: Electricity Bill, Corporation due to overdue tax, MSEDCL face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.