'गुराखी' म्हणणाऱ्या काकांना पुतण्या धनंजय सावंत यांच चोख उत्तर! जवळा गटातून दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:11 IST2026-02-09T13:10:39+5:302026-02-09T13:11:26+5:30
धाराशिवमध्ये मोठा राजकीय भूकंप! माजी मंत्री तानाजी सावंतांना पुतण्यानेच नमवलं

'गुराखी' म्हणणाऱ्या काकांना पुतण्या धनंजय सावंत यांच चोख उत्तर! जवळा गटातून दणदणीत विजय
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटात अखेर पुतण्याने काकांचा पराभव करत 'बंडाचा झेंडा' रोवला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) लढत आपल्या काकांच्या सत्तेला मोठे खिंडार पाडले आहे. मतमोजणीअंती धनंजय सावंत यांनी सुमारे २१०० मतांनी विजय मिळवत तानाजी सावंतांच्या राजकीय साम्राज्याला मोठा धक्का दिला आहे.
शब्दांचे वार अन् मतदारांचा आधार
निवडणूक प्रचारात काका-पुतण्यांमधील संवाद अत्यंत खालच्या थराला गेला होता. तानाजी सावंतांनी धनंजय यांना 'गुराखी', 'सुपरवायझर' अशा शब्दांत हिणवले होते, शिवाय "बापाच्या नादी लागायचं नाही," असा इशाराही जाहीरपणे दिला होता. या अपमानाला उत्तर देताना धनंजय सावंतांनी, "तुम्ही तुमची पातळी सोडली आहे, आता माझा तांडव पहा," असे आव्हान दिले होते. आजच्या निकालाने धनंजय सावंतांनी काकांच्या आव्हानाला मतपेटीतून उत्तर दिले आहे.
शिंदे सेनेला मोठा फटका
जवळा गटातून धनंजय सावंतांनी बंडखोरी करत शिंदे सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शड्डू ठोकला होता. भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या धनंजय यांना जनतेने भरघोस कौल दिला. जवळपास २१०० मतांचे मताधिक्य मिळवून त्यांनी तानाजी सावंतांच्या प्रतिष्ठेची जागा हिसकावून घेतली आहे. घराण्यातील या अंतर्गत कलहाचा फायदा धनंजय यांनी आपल्या समर्थ संघटनेच्या जोरावर उचलला असून, या विजयामुळे तानाजी सावंतांच्या जिल्ह्यावरील वर्चस्वाला तडे गेले आहेत.
तानाजी सावंत यांना दुहेरी धक्का
एकीकडे पुतण्याने पराभवाचा धक्का दिलेला असताना माजी मंत्री सावंत यांचे मतदान असलेल्या डोंजा गटात देखील शिंदेसेनेचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादीचा ( अजित पवार) उमेदवार विजयी. झाला आहे.