Dharashiv: तुळजापूर बसस्थानकात पर्समधून पैसे चोरताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:34 IST2025-11-13T18:33:49+5:302025-11-13T18:34:25+5:30
महिलेच्या सतर्कतेने रोख रक्कम आणि कागदपत्रे हस्तगत

Dharashiv: तुळजापूर बसस्थानकात पर्समधून पैसे चोरताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
धाराशिव : तुळजापूर बस स्थानकाच्या परिसरात गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी करून चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना १० नोव्हेंबर राेजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडण्यात आले आहे. बसमधून उतरत असलेल्या एका पुणे येथील महिलेच्या पर्समधील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेत असताना ही घटना उघडकीस आली.
पुणे येथील सिंहगड रोड, माणिक बाग येथील रहिवासी असलेल्या सुनयना हरिष निंबाळकर (४६) या घटनेच्या दिवशी तुळजापूर बस स्थानकावर बसमधून खाली उतरत होत्या. बसमधून उतरताना असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपी प्रेमिका देवू सकट (३०) आणि संजना सतिष उपाध्ये यांनी सुनयना निंबाळकर यांच्या पर्समध्ये हात टाकला. या आरोपींनी पर्समधून रोख रक्कम ९ हजार ५०० रूपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. ही चोरी करत असतानाच फिर्यादी सुनयना निंबाळकर यांना आरोपींच्या कृत्याची जाणीव झाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून दोन्ही महिला आरोपींना घटनास्थळी पकडले. चोरीला गेलेला ऐवज आणि कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली.
फिर्यादी सुनयना निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रेमिका सकट आणि संजना उपाध्ये यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०३(२) (चोरीसाठी शिक्षा) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.