Dharashiv: मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नव्हते, नैराश्यात शेतकऱ्याने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:00 IST2025-06-25T16:55:58+5:302025-06-25T17:00:02+5:30

मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून संपवले जीवन

Dharashiv: There was no money for his daughter's engineering admission, the farmer ended his life in depression | Dharashiv: मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नव्हते, नैराश्यात शेतकऱ्याने संपवलं जीवन

Dharashiv: मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नव्हते, नैराश्यात शेतकऱ्याने संपवलं जीवन

तेर (जि. धाराशिव) : डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर, त्यात पुढे हुशार मुलीच्या उच्च शिक्षणाचा संभाव्य खर्च, या विवंचनेतून धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील शेतकरी अमोल नवनाथ डक (३८) या शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी ढोकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

अमोल डक हे शेती कसून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांची जेवणे झाल्यानंतर ते १०:३० वाजता झोपण्यासाठी गेले. यानंतर घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यांनी साडीच्या साहाय्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर ७ वाजता हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यांचे नातेवाईक विनोद डक यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ढोकी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

विनोद डक यांच्या माहितीनुसार अमोल डक यांच्या मुलीची बारावी झाली होती. सीईटीत चांगले गुण मिळाल्याने तिला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता. मात्र, अमोल डक यांच्यावर आधीच बँकेचे कर्ज होते. त्यात पुन्हा मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे.

कुटुंबकर्ताच गेला
मृत अमोल डक यांच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व थकलेले वृद्ध आई-वडील, असा परिवार त्यांच्यामागे राहिला आहे. अमोल हे शेती करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.

Web Title: Dharashiv: There was no money for his daughter's engineering admission, the farmer ended his life in depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.