Dharashiv: साठवण तलाव फुटून पिकांसह माती वाहून गेली; १५० एकरवर शेतीचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:14 IST2025-09-19T16:10:32+5:302025-09-19T16:14:07+5:30
शेतकऱ्यांचे अश्रू, प्रशासनाची पाहणी; मदत कधी मिळणार?

Dharashiv: साठवण तलाव फुटून पिकांसह माती वाहून गेली; १५० एकरवर शेतीचे मोठे नुकसान
- संतोष वीर
भूम (धाराशिव): भूम शहरालगत असलेल्या साबळेवाडी येथील साठवण तलाव क्रमांक १ शुक्रवारी अचानक फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयवंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
३० एकरवरील पीक मातीसहित खरडून गेले
या दुर्घटनेत जवळपास १५० ते १७० एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये सुनगिरी शिवारातील सुमारे १०० एकर आणि साबळेवाडी भागातील ७० एकर शेतजमिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील ३० ते ४० एकर क्षेत्रावरील उभे पीक पुराच्या पाण्यासोबत मातीसहित खरडून वाहून गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कारणांबाबत चर्चा आणि संताप
अचानक फुटलेल्या या पाझर तलावामागे नेमके काय कारण आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी सांगितले की, “साबळेवाडी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे तलावाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही आणि तलाव फुटला.” मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तलावाच्या भिंतींच्या देखभालीतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याची शंका व्यक्त केली आहे.
तात्काळ मदतीची मागणी
या दुर्घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. शेतकरी विजय साबळे म्हणाले, "पूर्ण खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुसती मदत जाहीर न करता, ती तात्काळ प्रत्यक्षात देणे अपेक्षित आहे."
नुकसानीचे पंचनामे सुरू
तहसीलदार जयवंत पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, मदतीचा निधी मिळताच तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. यासोबतच, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून इतर साठवण तलावांचीही तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याची मागणी केली आहे.