Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:42 IST2025-09-22T16:41:11+5:302025-09-22T16:42:09+5:30
आमदार सावंत, खासदार निंबाळकर, माजी आमदार मोटेंच्या प्रयत्नांनी वाचले सहा जीव

Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!
- संतोष वीर
भूम (धाराशिव) : भूम तालुक्याच्या सीमेवरील आणि परांडा तालुक्यातील लाकी गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उल्का नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने मध्यरात्री १२ वाजता घडलेल्या घटनेत सहा नागरिकांचा जीव धोक्यात सापडला होता. भूम तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाल्याने अंतरगाव परिसरातील बाणगंगा नदीला मोठा पूर आला होता. त्याच वेळी परांड्यातही पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला. बाणगंगेचे पाणी पुढे वाहत जाऊन लाकी गावाजवळील उल्का नदीत मिसळले आणि उल्का नदी ने धोक्याची पातळी ओलांडून पात्रा बाहेर पाणी वाहण्यास सुरुवात झाली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत पाणी प्रवाहेन वाहू लागले. परिणामी लाकी गावातील पिंगळे व गायकवाड वस्ती पुराच्या पाण्यात वेढली गेली.
या भागात राहणाऱ्या १८ नागरिकांच्या घरांमध्ये रात्री अकरा वाजता पाणी शिरले. त्यामुळे हे नागरिक जीव मुठीत धरून घराच्या स्लॅबवर चढून रात्रभर पडत्या पावसात भिजत अडकून राहिले. यातील १२ नागरिक हे नदी पात्रा पासून थोडे दूर असल्याने सकाळी पाणी आटू लागल्यानंतर वाहत्या पाण्याचा अंदाज घेत. धाडस करून स्वतः सुरक्षित बाहेर आले. मात्र नदी पात्रा जवळ पाण्याचा जोर कायम असल्याने पांडुरंग पिंगळे, सुनिता पिंगळे, गोपिका गायकवाड, हरी मंडल, बाळू गायकवाड व अलका गायकवाड हे सहा नागरिक रात्रभर पावसात भिजत जीव मुठीत धरून बसले होते. सदरील भागात परिस्थिती गंभीर होत असल्याने आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा केला. नागरिकांना मदत मिळेपर्यंत ते पुरग्रस्तांच्या संपर्कात राहिले. सकाळी सहाच्या सुमारास एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली; मात्र पाण्याचा जोर कमी न झाल्याने त्यांना थांबावे लागले. शेवटी सकाळी नऊच्या सुमारास पाणी थोडे ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या सहा नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
धाराशिव जिल्ह्यातील उल्का नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका. #dharashiv#floodpic.twitter.com/JUnr9zoGXV
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 22, 2025
दरम्यान, या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरही मागवण्यात आले होते. मात्र नगर परिसरात सकाळी सहा वाजता दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर ला पूर आलेल्या भागाचे लोकेशन ट्रॅक झाले नाही. त्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाही. नागरिक सुरक्षित झाल्यानंतरच हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त भागावर काही गिरट्या मारून परिस्थितीची पाहणी केली व नंतर परत गेले. या घटनेमुळे प्रशासनाच्या तत्परतेने व जनप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. गावकऱ्यांनी दिलासा व्यक्त करताना बचाव पथकाचे मनापासून आभार मानले.