Dharashiv: ९ लाख द्या, नाहीतर पवनचक्कीचे साहित्य जाळतो; कंटेनर अडवून खंडणी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:08 IST2025-11-12T16:07:46+5:302025-11-12T16:08:15+5:30
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली १० नाेव्हेंबर राेजी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dharashiv: ९ लाख द्या, नाहीतर पवनचक्कीचे साहित्य जाळतो; कंटेनर अडवून खंडणी मागितली
धाराशिव : वाशी तालुक्यातील जवळका शिवारात पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तीन कंटेनर वाहनांना रस्त्यावर अडवून, ती सोडवण्यासाठी ९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी खंडणी न दिल्यास वाहने जाळून टाकण्याची धमकीही दिली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली १० नाेव्हेंबर राेजी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महादेव मनोहर चेडे (५६, रा. वाशी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सेरेंटिका रिन्युएबल प्रा. लि. या कंपनीचे पवनचक्की सबस्टेशनचे सामान घेऊन जाणारे कंटेनर (क्र. एमएच.४०-बीएल. ८८७९, जीजे.१२-बीवाय. २३०० आणि एमएच. ४६-बीएफ. ९८२२) हे जवळका शिवारातून दहिफळ येथील सबस्टेशन पॉईंटकडे जात होते.
यावेळी, हनुमंत परमेश्वर नाळपे, रुपेश हनुमंत नाळपे आणि शैलेश हनुमंत नाळपे (सर्व रा. जवळका) या तिन्ही आरोपींनी रस्त्यावर कंटेनर आडवले. करारनामा प्रमाणे कंपनीने रक्कम दिलेली असतानाही, आरोपींनी अडवलेली वाहने सोडवण्यासाठी फिर्यादीकडे थेट नऊ लाख रुपये खंडणीची मागणी केली. यावेळी, आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत, "जर पैसे दिले नाहीत तर वाहने जाळून टाकीन," अशी गंभीर धमकी दिली.
या प्रकारानंतर, फिर्यादी महादेव चेडे यांनी दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. वाशी पोलिसांनी आरोपी हनुमंत नाळपे, रुपेश नाळपे आणि शैलेश नाळपे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४) (खंडणीसाठी धमकी), १२६(२) (अनुचित अवरोध), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२), ३५१(३), ३५१(४) (आपराधिक धमकी) आणि ३(५) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.