मुलगा होत नसल्याने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; पोटच्या मुलीच्या साक्षीने नराधम पतीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:00 IST2026-03-05T15:59:05+5:302026-03-05T16:00:02+5:30

'मुलगाच हवा' या हट्टापायी ३ मुलींनंतर चौथ्या बाळंतपणात पत्नीचा खून; धाराशिव न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Dharashiv: Man Sentenced to Life Imprisonment for Killing Pregnant Wife Over Desire for Son | मुलगा होत नसल्याने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; पोटच्या मुलीच्या साक्षीने नराधम पतीला जन्मठेप

मुलगा होत नसल्याने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; पोटच्या मुलीच्या साक्षीने नराधम पतीला जन्मठेप

धाराशिव : मुलगा होत नसल्याच्या रागातून आणि चौथ्या अपत्याच्या वादातून स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ४ मार्च राेजी सुनावली आहे.

आरोपी धनंजय भारत माळी आणि मयत गोजर धनंजय माळी यांना तीन मुली होत्या. आरोपीला मुलगा हवा होता, त्यासाठी तो पत्नीला वारंवार त्रास देऊन मारहाण करत असे. आरोपी कोणताही कामधंदा करत नसल्यामुळे, तीन मुलींचा सांभाळ करणे कठीण जात असल्याचे सांगत मयत पत्नीने चौथे अपत्य नको अशी भूमिका घेतली होती. मात्र, मुलगाच हवा या हट्टापायी त्यांच्यात सतत वाद होत असत. अखेर १९ डिसेंबर २०२४ रोजी, वाद टाळण्यासाठी गोजर माळी यांनी चौथ्या अपत्यासाठी संमती दिली आणि त्या गरोदर असल्याचे समोर आले होते. त्याच दिवशी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने आपल्या १० वर्षांच्या मुलीला "माझे डोके दुखत आहे, तू बाहेर खेळायला जा" असे सांगून खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा दाबून तिच्यावर कोयत्याने वार केले. मुलीने आरडाओरड ऐकून पाहिले असता, आरोपी रक्ताळलेल्या अवस्थेत तेथून पळून जात होता.

या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. या प्रकरणात मयताची १० वर्षांची मुलगी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरली. तिच्या साक्षीसोबतच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल आणि आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने हे पुरावे ग्राह्य धरून, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी आरोपी धनंजय माळी यास भारतीय दंड विधान कलम १०३ (१) अन्वये दोषी ठरवले. ४ मार्च रोजी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. गिते यांनी केला होता.

Web Title : बेटा न होने पर पत्नी की हत्या; पति को आजीवन कारावास।

Web Summary : बेटा न होने से नाराज़ पति ने गर्भवती पत्नी की हत्या की, आजीवन कारावास। बेटी की गवाही अहम। अदालत ने सबूतों के आधार पर दोषी ठहराया।

Web Title : Wife killed for not bearing son; life term for husband.

Web Summary : Man gets life for murdering his pregnant wife, upset she wasn't bearing a son. Daughter's testimony crucial. Court convicts him based on evidence.