काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:58 IST2026-02-16T19:58:11+5:302026-02-16T19:58:32+5:30
नुकत्याच पार पडलेल्या जि. प. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले उद्धवसेना व काँग्रेस हे स्वतंत्र लढले होते.

काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका
कळंब : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील धुसफुशीचे पर्यवसान शनिवारी रात्री कळंब शहरात मोठ्या राड्यात झाले. शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री काँग्रेस (आय) आणि उद्धवसेना पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विशेष म्हणजे, हा प्रकार पोलिसांच्या समोर घडत असतानाही त्यांनी घेतलेल्या 'बघ्याच्या भूमिके'मुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जि. प. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले उद्धवसेना व काँग्रेस हे स्वतंत्र लढले होते. यावेळी शहराशेजारील डिकसळ गटातून उद्धवसेनेकडून संजित मस्के यांच्या पत्नी वर्षा मस्के रिंगणात होत्या, तर काँग्रेसने शीतल वनकळस यांना उमेदवारी दिली होती. येथे शिंदेसेनेच्या पूजा शिंदे विजयी झाल्या. या निवडणुकीच्या प्रचार काळात काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचेच पर्यवसान काल हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येतेय.
दरम्यान, या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांना पाहून हे दोन्हीही गट पांगायला हवे होते, मात्र यातील एका गटाने आक्रमक पवित्रा घेऊन दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांना मारहाण चालू केली. काहींनी कपडे फाडले, एकाने खाली पाडले तर एकाने गुद्याने मारहाण केली. पोलिसांसमोर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यास कार्यकर्ते घाबरत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी गुंडागर्दी विरोधात दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेश सचिव कुंभार जखमी
या घटनेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांच्या बोटाला मार लागल्याची माहिती आहे. तसेच दुसऱ्या गटातील काही जणांना मुका मार लागल्याने त्यांनीही दवाखान्यात उपचार घेतल्याचे सांगण्यात येतेय.
पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात
शनिवारी रात्री पोलिसांसमोर हा प्रकार घडला. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर लागलीच व्हायरल झाले होते. त्यामध्ये कोण कोणाला मारत आहे? याचे स्पष्ट चित्रण दिसत असताना पोलिस फिर्यादीची वाट का बघत आहेत, असा प्रश्नही शहरवासीयांतून विचारला जातोय. हा राजकीय मामला आहे म्हणून पोलिस प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असतील तर उद्या काहीही पोलिस कार्यवाही होत नाही असे समजून या मंडळींचे धाडस वाढून ते सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर हात टाकण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
पोलिसांची अनुपस्थिती ठरू शकते घातक
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा तसेच संवेदनशील भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. येथे कायम पोलिस कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. मात्र, मागील वर्षभरापासून येथील पोलिस कर्मचारी काढून घेण्यात आलाय. परिणामी या भागात सातत्याने वाद, मारामारी, ट्राफिक जाम, अपघात असे प्रकार घडतात.
शनिवारी झालेल्या घटनेबाबत दोन्ही गटांनी अद्याप कोणतीही तक्रार दिली नाही, कोणी तक्रार दिली तर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- अजित चिंतले, पोनि, कळंब