तामलवाडी(जि. धाराशिव): अत्यंत थरकाप उडवणारी अन् माणुसकीला काळीमा फासणारी घटना तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी शिवारात उघडकीस आली आहे. अवघ्या १३ महिन्यांच्या निष्पाप बालिकेची तिच्याच सख्ख्या चुलत्याने गळा आवळून हत्या केली आणि रागाच्या भरात सत्तुराने शरीराचे सात तुकडे करून शेतात पुरले. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली असून, तामलवाडी पोलिसांनी नराधम चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार, गवळेवाडी येथील महादेव माने यांची १३ महिन्यांची मुलगी आराध्या ही २७ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक बेपत्ता झाली होती. २८ फेब्रुवारी रोजी वडील महादेव माने यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सपोनि गोकुळ ठाकूर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मुलगी बेपत्ता झाली, त्या दिवशी तिचा चुलता शंकेश माने हा तिला घेऊन जाताना दिसला होता.
पोलिसांनी संशयावरून शंकेश माने याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, जी ऐकून पोलीसही हादरले. आरोपीने सांगितले की, "आराध्याची आई एका परपुरुषासोबत पळून गेली, तसेच ही मुलगी माझ्या भावाच्या रक्ताची नाही," असा संशय त्याच्या मनात घर करून होता. याच रागातून त्याने २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० ते ५.०० च्या दरम्यान आराध्याला घरातून उचलले आणि शेतात नेले.
तिथे प्रथम तिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर पुराव्याचा नायनाट करण्यासाठी रागाच्या भरात सत्तुराने तिच्या चिमुकल्या शरीराचे सात तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून त्याने शेतात पुरून टाकले. शनिवारी रात्री आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर, रविवारी सकाळी ८ वाजता तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचांसमक्ष पुरलेले प्रेत बाहेर काढण्यात आले. रक्ताने माखलेले ते पोते आणि त्यातील चिमुरडीचे तुकडे पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. प्रेत शवविच्छेदनासाठी तुळजापूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (कलम १०३) दाखल करण्यात आला आहे.
तपासाची चक्रे अन् पोलिसांची तत्परता
पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास केला. सपोनि गोकुळ ठाकूर, सपोफौ विनायक सरगुले, पोहेकॉ जुबेर काझी, दिनकर तोगे, संजय कलमदाने, नितीन भोसले, पोलीस अंमलदार सूरज नरवडे, नजीर बागवान, उमेश माने, तुराब शेख यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला जेरबंद केले.
Web Summary : A 13-month-old girl was murdered by her uncle in Tamalwadi, Maharashtra. Driven by suspicion of illegitimacy, he strangled her and dismembered the body into seven pieces before burying them. Police arrested the uncle, revealing the horrific crime after the girl was reported missing.
Web Summary : तामलवाड़ी, महाराष्ट्र में एक चाचा ने 13 महीने की बच्ची की हत्या कर दी। नाजायज होने के संदेह में उसने बच्ची का गला घोंट दिया और शव को सात टुकड़ों में काटकर दफना दिया। पुलिस ने चाचा को गिरफ्तार कर लिया, बच्ची के लापता होने की रिपोर्ट के बाद भयावह अपराध का खुलासा हुआ।