Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:20 IST2025-09-10T13:20:04+5:302025-09-10T13:20:32+5:30

मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले.

Dharashiv: Beloved Guruji's transfer, students' outcry, 'Guruji, don't leave our school!' Will he come again? | Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

- मुकुंद चेडे
वाशी (जि. धाराशिव) :
शाळा आणि विद्यार्थी हेच आपले प्रथम कर्तव्य मानणारे शिक्षक प्रशांत जाधवर यांच्या निरोपाने दशमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी अक्षरशः गहिवरले. आपल्या लाडक्या गुरुजींची बदली झाल्याने चिमुकल्यांनी हंबरडा फोडला, तर या हृदयस्पर्शी क्षणाने इतर शिक्षक आणि पालकांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले.

जवळपास १८ वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत जाधवर, गेल्या सात वर्षांपासून दशमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून रुजू होते. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी या 'नीरस' शालेय परिसराला 'निसर्गरम्य' केले. उन्हाळ्याच्या सुटीतही दूरवरून पाणी आणून त्यांनी ५०० हून अधिक झाडे जगवली. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी शाळेची इमारत बोलकी केली आणि परिसर विकासाला चालना दिली. त्याचबरोबर, ज्ञानरचनावादी आणि आनंददायी शिक्षण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन शिकविले. आपल्या कामाशी आणि विद्यार्थ्यांशी एकरूप झालेल्या जाधवर यांची बदली झाल्याचे ऐकून विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. गुरुजींनी 'रिलिव्ह' होऊ नये, अशीच भावना त्यांच्या मनात होती.

अखेर सोमवारी बदलीचे आदेश आले आणि मंगळवारी जाधवर शाळेतून निरोप घेऊन नवीन शाळेकडे जायला निघाले. त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा बांध फुटला. मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले. सात वर्षांच्या त्यांच्या सेवायज्ञाचे स्थलांतर होत असल्यामुळे सर्वांनाच दुःख झाले. 'लेकीला सासरी पाठवताना' जसा प्रसंग असतो, तशीच अनुभूती त्या क्षणी येत होती. गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यातील हे अनोखे नाते सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.

लेक चालली नव्हे गुरुजी चालले
- काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुजींच्या बदलीचे आदेश अखेर सोमवारी निर्गमित झाले. यानंतर मंगळवारी बदली झालेले सर्व गुरुजी जुन्या शाळेतून नव्या शाळेकडे कूच करू लागले. याच दरम्यान दशमेगाव येथील सहशिक्षक प्रशांत जाधवर हे आपल्या दशमेगाव येथील शाळेतून 'निरोप' घेऊन नव्या शाळेत 'रुजू' होण्यासाठी निघाले.
- ताेच लळा लागलेल्या तसेच आत्मीयता व एक ऋणानुबंध निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. धायमोकलून मुले रडत होती. आपल्या लाडक्या गुरुजींच्या गळ्यात पडत होती. मोठ्याने हंबरडा फोडत होती.
- याक्षणी सहकारी शिक्षकवृंदांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही पालक गहिवरले. सात वर्षांचा एक सेवायज्ञ स्थलांतरित होत होता याचे त्यांना दु:ख वाटत होते. लेकीला पाठवणी करतेवेळच्या प्रसंगाची यावेळी अनुभूती होत होती.

Web Title: Dharashiv: Beloved Guruji's transfer, students' outcry, 'Guruji, don't leave our school!' Will he come again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.