वेग इतका की कारच्या चार पलट्या, झाडं उन्मळली; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:04 IST2025-07-19T16:01:56+5:302025-07-19T16:04:05+5:30
धाराशिव जिल्ह्यातील पारगावजवळ मृत्यूने थैमान घातलं; मृत दोघेही छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी

वेग इतका की कारच्या चार पलट्या, झाडं उन्मळली; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पारगाव (जि. धाराशिव) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पारगावनजीक मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जखमींवर बीड येथे उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
बीडहून सोलापूरकडे निघालेली भरधाव कार (क्र. एमएच. २०-एचबी. ९७७६) पारगावच्या उत्तरेकडे सुमारे २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील एका वळणावर आली. मात्र, चालकाला समाेरील वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले असता, कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीने रस्त्यालगतच्या झाडांना जोरदार धडक दिली. यात अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही तुटली. गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी अपघातात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल येथील रहिवासी असलेले ऋषिकेश सुदाम औताडे (२५) आणि अजिंक्य अंबादास लेंबे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
गाडीतील अन्य प्रवासी रोहन कडुबा जाधव आणि मयूर माधव गावंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनमधील पारगाव बिटचे हेड कॉन्स्टेबल राजू लाटे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.