वाहनातून गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:09+5:302021-08-15T04:33:09+5:30
कळंब : कळंब शहरालगतच्या डिकसळ भागात एका जीपमधून १६ किलोच्या आसपास गांजा पकडण्यात आला. कळंब पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ...

वाहनातून गांजा जप्त
कळंब : कळंब शहरालगतच्या डिकसळ भागात एका जीपमधून १६ किलोच्या आसपास गांजा पकडण्यात आला. कळंब पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.
खासगी जीप अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतून गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने कळंब पोलीसही दिवसभर सतर्क होते. यासाठी पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या रस्त्यावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास कळंब शहरालगतच्या डिकसळ भागात एमएच २८ सी २५८३ क्रमांकाच्या गाडीचा संशय आल्याने कळंब पोलिसांनी या गाडीला अडविले. यानंतर, बारकाईने पाहणी केली असता, त्यामध्ये काही गांजाचे पुडे आढळून आले. यानंतर, कळंब पोलिसांनी तत्काळ फोरेन्सिक व अमली पदार्थ विरोधी पथकाला याची माहिती दिली. या विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तपासणी केला असता, १६ किलोच्या आसपास गांजाचे पुडे दिसून आले. याचा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.