'तू माझ्या मनात बसलीस'; महिला पोलिसाचा विनयभंग करून बदलीसाठी घेतली लाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:54 IST2022-06-24T13:53:47+5:302022-06-24T13:54:03+5:30
उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एजाज अजीम शेख (४६) याच्याकडे एक २७ वर्षीय महिला कर्मचारी बदलीच्या कामानिमित्त गेली होती.

'तू माझ्या मनात बसलीस'; महिला पोलिसाचा विनयभंग करून बदलीसाठी घेतली लाच
उस्मानाबाद : तू माझ्या मनात बसलीस, मला तू आवडतेस असे बोलत हात धरून एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या लाचखोर लिपिकावर बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेउस्मानाबादेत कारवाई केली आहे. या कारवाईत बदलीसाठी स्वीकारलेली १० हजारांची रक्कमही जप्त करण्यात आली.
उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एजाज अजीम शेख (४६) याच्याकडे एक २७ वर्षीय महिला कर्मचारी बदलीच्या कामानिमित्त गेली होती. या महिलेने बदलीसाठी अर्ज केला होता. तो वरिष्ठ लिपिकास सांगून आपण हे काम करुन देऊ, असे आश्वासन आरोपीने दिले होते. यासाठी १० हजार रुपयांची लाचही मागितली होती. मात्र, महिला कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खात्री केल्यानंतर निरीक्षक अशोक हुलगे, सिद्धेश्वर तावसकर, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य यांच्या पथकाद्वारे बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातच सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास आरोपी एजाज शेख याने तक्रारदार महिलेकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली व हाताला धरून तू मला पहिल्या दिवशीच आवडली होतीस, तू माझ्या मनात बसली आहेस, असे म्हणत विनयभंगही केला. याच वेळी पथकाने आरोपीस रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.