कळंब येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी भाजप-सेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:49 IST2018-09-18T16:48:53+5:302018-09-18T16:49:37+5:30
शंभू महादेव साखर कारखान्याच्या लिलाव प्रकरणी गुन्हा दाखल करावा व गाळप झालेल्या ऊसाची रक्कम द्यावी यामागणीसाठी कळंब येथे बुधवारी भाजपा-शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

कळंब येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी भाजप-सेनेचा मोर्चा
कळंब (उस्मानाबाद ) : शंभू महादेव साखर कारखान्याच्या लिलाव प्रकरणी गुन्हा दाखल करावा व गाळप झालेल्या ऊसाची रक्कम द्यावी यामागणीसाठी कळंब येथे आज भाजपा-शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
नुकतेच भाजपात डेरेदाखल झालेले एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजीत पिंगळे, तालुका प्रमुख शिवाजी कापसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. दिलीप पाटील आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात अनेक गंभीर आरोप केले.सुमारे १५० कोटीची मालमत्ता असलेला हा कारखाना केवळ ५४ कोटी रूपयात घशात घातला असून वैद्यनाथ बँकेने न्यायालयाचे आदेश नसतांना शेतकर्यांची व देणेकरांची फसवणूक करून व्यवहार केल्याने डीडीएन व वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
स्थानिक आमदार हा कारखाना हडप करण्याचा प्रयत्न करत असून शेतकर्यांचे पैसे दिल्याशिवाय कारखान्यात त्यांना प्रवेश देवू नये अशी त्यांनी मागणी केली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई मोहन गुंड, प्रा. साहेबराव बोंदर, सतीश देशमुख, सतपाल बनसोडे, संदीप बाविकर आधी उपस्थित होते