नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 21:05 IST2021-11-09T21:04:56+5:302021-11-09T21:05:46+5:30
रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली.

नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी
लोहारा (जि.उस्मानाबाद ): नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास लोकमंक कारखान्याजवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. शहरातील लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक सुरू आहे. परंतु अनेक वाहाने नादुरूस्त होऊन रस्त्यावरच उभी केली जात आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अर्जून रघू पवार (वय २०) व मेघनाथ पवार (वय १२ हे दोघे रा. राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात अर्जून पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर मेघनाथ पवार हा गंभीर जखमी झाला.
जखमींना युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, परवेज तांबोळी,निळकंठ कांबळे यांनी आपल्या स्वत:च्या वाहानातून लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अर्जून पवार याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर जखमी मेघनाथ याला उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.