मोठी बातमी! सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गासाठी राज्य वाट्यातील १५० कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:57 IST2026-02-07T19:56:41+5:302026-02-07T19:57:01+5:30
तत्कालीन महायुतीच्या राज्य सरकारने या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च उचलण्यास संमती दर्शवली होती. त्यानुसार ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचे दायित्व राज्य सरकारने स्वीकारले.

मोठी बातमी! सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गासाठी राज्य वाट्यातील १५० कोटी मंजूर
धाराशिव : नव्याने साकारल्या जात असलेल्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिवरेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने त्यांच्या वाट्यापैकी १५० कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. ६ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.
दरम्यानच्या काळात सर्वेक्षणही पूर्ण झाले. मात्र, उत्पन्नाच्या दृष्टीने नॉट फिजिबल असा शेरा मारून रेल्वेने हा मार्ग अडगळीत टाकला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हा विषय पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी हा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २०१९ साली हा मार्ग पिंकबुकमध्ये आला. या मार्गाची त्यावेळची प्रकल्प किंमत ही ९०४ कोटी ९२ लाख रुपये इतकी होती. तत्कालीन महायुतीच्या राज्य सरकारने या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च उचलण्यास संमती दर्शवली होती. त्यानुसार ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचे दायित्व राज्य सरकारने स्वीकारले.
दरम्यान, आता या प्रकल्पाची किंमत वाढून तब्बल ३२९५ कोटी रुपये इतकी झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने या सुधारित प्रकल्प किमतीस मान्यता देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिल्यानंतर राज्याने गतवर्षीच त्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारचे दायित्व १६४७ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. यापैकी ४० कोटी रुपये यापूर्वीच वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, काम गतीने पुढे सरकत असल्याने रेल्वेने १५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली असून, लवकरच हा निधी वितरीत केला जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. तो गतीने पूर्ण होण्यासाठी महायुती सरकारकडे आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आज १५० कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमार्गाच्या कामाला आणखी गती मिळून लवकरच तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येऊ शकेल.
-राणा जगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर.