धाराशिवमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पोलिसांना पाहताच आरोपी कट्टा फेकून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:35 IST2025-12-31T17:31:03+5:302025-12-31T17:35:01+5:30
पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.

धाराशिवमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पोलिसांना पाहताच आरोपी कट्टा फेकून पळाला
धाराशिव : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा पोलिस सतर्क झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका सराईत गुन्हेगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एक अवैध गावठी कट्टा जप्त केला आहे. तुळजापूर तालुक्यातील कारला येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने शस्त्र टाकून पळ काढला असून, त्याच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात ३० डिसेंबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर परिसरात गस्त घालत असताना, सपोनि सुदर्शन कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. जिल्हा अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले (रा. कारला) हा त्याच्या राहत्या घरी गावठी कट्ट्यासह थांबला असून, तो चोरीच्या उद्देशाने बाहेर पडणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने कारला येथील गणेश भोसले याच्या घरावर छापा टाकला. घराच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या गणेशला पोलिसांची चाहूल लागताच, त्याने सोबत असलेला गावठी कट्टा तिथेच फेकून दिला आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून तो कट्टा जप्त केला आहे. ही कामगिरी पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलिस कर्मचारी शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, शोभा बांगर आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.