Dharashiv: मतदार यादीच्या गोंधळाची सोशल मिडियात पोस्ट करणाऱ्याच्या घरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:05 IST2025-11-04T18:04:23+5:302025-11-04T18:05:53+5:30
प्रभागातील यादीत बाहेरील गावात वास्तव्यास असलेल्या लोकांची नावे दिसून आल्याचा दावा

Dharashiv: मतदार यादीच्या गोंधळाची सोशल मिडियात पोस्ट करणाऱ्याच्या घरावर हल्ला
धाराशिव : आपल्या प्रभागातील मतदार यादीत गोंधळ झाला असून, बाहेरगावातील नावे यात समाविष्ट केल्याची पोस्ट सोशल मीडियात टाकल्याने रविवारी धाराशिवमध्ये आपल्या घरावर हल्ला झाल्याचा दावा ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्याने सोमवारी केला आहे. जवळपास सहा जणांनी घरात घुसून जबर मारहाण केल्याने संबंधित कार्यकर्ता व त्याची आई जखमी झाली असून, त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
धाराशिव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी तांत्रिक कारणामुळे ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होऊ शकली नव्हती. दरम्यान, ती प्रसिद्ध होताच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील मतदारांची यादी तपासली. ठाकरेसेनेचे कार्यकर्ते गणेश साळुंके यांनीही त्यांच्या प्रभागातील यादी तपासली असता, त्यात बाहेरील गावात वास्तव्यास असलेल्या लोकांची नावे दिसून आल्याचा दावा ते करीत आहेत. यातून साळुंके यांनी सोशल मीडियात याबाबतची पोस्ट व्हायरल केली. याचा राग मनात धरून विरोधक विलास लोंढेसह इतर पाच-सहा जणांनी रविवारी रात्री घरावर हल्ला केला. घरात व अंगणात दगडफेक करून ते घरात शिरले. त्यांनी आपल्यासह आईलाही मारहाण केल्याचा दावा गणेश साळुंके यांनी केला आहे. या दोघांवरही धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
मनसे झाली आक्रमक
ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक मनसे चांगलीच आक्रमक झाली. पदाधिकारी पाशा शेख यांनी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विलास लोंढे असून, त्यांनी कामगार नोंदणी प्रक्रियेत हेराफेरी करीत मोठी माया जमवल्याचा आरोप केला आहे. विलास लोंढे याच्यासह त्याच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी शेख यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
तक्रारीसाठी दोघेही ठाण्यात
गणेश साळुंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सोमवारी ते तसेच विलास लोंढे दोघेही शहर ठाण्यात तक्रारीसाठी गेले होते. साळुंके यांच्याकडून मारहाण तर लोंढे यांच्याकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार असल्याचे समजते. मात्र, सक्षम अधिकारी त्यावेळी नसल्याने गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू झाली.