'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:49 IST2025-11-05T17:47:52+5:302025-11-05T17:49:37+5:30
मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही.

'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
- संतोष वीर
भूम (धाराशिव): अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आज, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाथरूड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर 'शेतकऱ्यांना फसवणारे चोर' असल्याची धारदार टीका केली.
ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीची भीषणता मांडली. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून वाहून गेली, तर दुभती जनावरेही डोळ्यांदेखत गेली. प्रशासनाने पंचनामे करून मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही. "या पॅकेजला खेकड्याने भोके पाडले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा बोचरा टोला ठाकरे यांनी लगावला.
'शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा'
ज्या शेतकऱ्यांमुळे अखंड महाराष्ट्राला सोने पिकवून अन्न मिळते, त्याच अन्नदात्यावर वेळ आल्यावर सरकारने किडलेले आणि सडलेले धान्य खाण्यासाठी दिले. याची सरकारला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. सर्वात जास्त संताप व्यक्त करताना ते म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांनी हेक्टरी हजारो रुपये विमा भरला, त्यांना नुकसान भरपाई म्हणून काय मिळाले? एक, दोन, तीन किंवा जास्तीत जास्त पन्नास रुपये! ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे."
विमा कंपनीवर मोर्चा काढणार
ठाकरे यांनी यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना निर्देश दिले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १, २, ३ रुपये विमा जमा झाला आहे, त्यांचे बँक स्टेटमेंट जमा करा. शिवसैनिक आणि शेतकरी एकत्र येऊन विमा कंपनीवर मोर्चा काढतील आणि जाब विचारतील.
ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी बोलताना, "विहीर बुजलेल्यांना ३० हजार, तर जमीन खरडून गेलेल्यांना ३.५० लाख मदत करण्याची घोषणा झाली, पण साधे तीन रुपये तरी मिळाले का?" असा सवाल उपस्थित केला. तसेच, विरोधक या दौऱ्याला 'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून' आलेला दौरा म्हणत असल्याची टीका करत त्यांनी स्पष्ट केले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतीही निवडणूक नसतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती."
यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज, शहर प्रमुख प्रकाश आकरे, उपतालुका प्रमुख अब्दुल सय्यद, गणेश दुरंदे, प्रल्हाद अडागळे,महिला जिल्हाप्रमुख जिनत सय्यद, तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.