अपघातात अर्धांगिनी गेली, पतीची मृत्यूशी झुंज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 14:06 IST2021-11-12T14:04:19+5:302021-11-12T14:06:01+5:30
कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस कारने जोराची धडक दिली.

अपघातात अर्धांगिनी गेली, पतीची मृत्यूशी झुंज सुरू
ढोकी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील गडावर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस कारने जोराची धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पुरुषाची शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील लतीफ शेख व तय्यबबी शेख हे दाम्पत्य गुरुवारी दुपारी गड येथे आयोजित कौटुंबिक कार्यक्रमासाठी गावातून दुचाकीवर निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावरील गडपाटी येथे पोहोचताच समोरून येणाऱ्या (एमएच १२ क्युएम ६७६१) क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या घटनेत पाठीमागे बसलेल्या तय्यबबी यांना गंभीर इजा होऊन त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, लतीफ शेख यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
याठिकाणी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करून लतीफ यांना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. ते सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याअंतर्गत असलेल्या येडशी आऊटपोस्टमध्ये या घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री सुरू होते.