आणखी एका काका-पुतण्यात संघर्ष; माजी मंत्री तानाजी सावंतांपुढे पुतण्याकडून बंडाचे निशाण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:04 IST2026-01-22T18:03:30+5:302026-01-22T18:04:53+5:30
मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच या काका-पुतण्यात काहीसे अंतर निर्माण झाल्याचे दिसून आले.

आणखी एका काका-पुतण्यात संघर्ष; माजी मंत्री तानाजी सावंतांपुढे पुतण्याकडून बंडाचे निशाण !
- चेतन धनुरे
धाराशिव : राज्याला काका-पुतण्यातील संघर्ष नवा नाही. यात आता आणखी एका काका-पुतण्यातील संघर्षाचा अध्याय जोडला जात आहे. माजी मंत्री आ. तानाजी सावंत व त्यांचे पुतणे माजी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यात राजकीय अंतर निर्माण झाले आहे. एकीकडे युतीच्या भानगडीत न पडता स्वतंत्र चूल सावंतांनी मांडलेली असताना आता पुतण्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष म्हणून आपली स्वतंत्र फौज मैदानात उतरवत बंडाचे निशाण फडकावले आहे. ते माघारीपर्यंत टिकते का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांनी नगर परिषद निवडणुकीत परंडा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही नगर परिषदेत स्वबळ आजमावले. यात नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले तरी, नगरसेवकांचे बहुमत मात्र विरोधकांकडे गेले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आ. सावंत यांनी शिंदेसेनेकडून स्वतंत्र उमेदवार देऊ केले आहेत. या मतदारसंघातून आजघडीला तरी कोणतीही युती अथवा आघाडी झालेली नाही. सर्वच प्रमुख पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. दरम्यान, आ.सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही परंडा मतदारसंघातील ५ गट व ११ गणातून आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून उतरवत घरातूनच बंडाचे निशाण फडकावले आहे. ते टिकते की यु टर्न घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वर्षभरापासून दुरावा
आ. सावंत हे मंत्री असताना परंडा मतदारसंघातील संपूर्ण कामकाजाची सूत्रे पुतणे धनंजय सावंत यांच्याकडे होती. अगदी निवडणूक व्यवस्थापनही ते पाहायचे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच या काका-पुतण्यात काहीसे अंतर निर्माण झाल्याचे दिसून आले. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून हे अंतर स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आ. सावंत हे या बंडाची दखल घेतील, असे चित्र सध्यातरी नाही.
जिंकून दाखवू
लोकशाहीत निवडणुका लढण्याचा सर्वांना अधिकार आहे. काही ध्येय-धोरणे आपणास पटली नाहीत. जिल्हा परिषदेत असताना केलेल्या कामकाजाच्या जोरावर व समर्थकांच्या विश्वासावर ५ गट व ११ गणांत उमेदवार दिले आहे. मी स्वत: दोन गटांतून उमेदवार आहे. निवडणुका लढू व मतदारांच्या साथीने त्या जिंकून दाखवू.
- धनंजय सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष.