बंद कार सुरू करण्याच्या प्रयत्नात भडका उडाला; कारच्या मालकाचा हाेरपळून मृत्यू, दोघे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:45 IST2025-06-02T19:44:39+5:302025-06-02T19:45:02+5:30
कारने पेट घेतल्यानंतर मालकाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही; दोघे मित्र बालंबाल बचावले

बंद कार सुरू करण्याच्या प्रयत्नात भडका उडाला; कारच्या मालकाचा हाेरपळून मृत्यू, दोघे बचावले
- समीर सुतके
उमरगा (जि. धाराशिव) : शिर्डी येथून साई दर्शन आटाेपून तिघे मित्र कारमधून आपल्या गावी हैदराबादकडे परतत हाेते. रविवारी पहाटे उमरगा तालुक्यातील दाबका गावानजीक त्यांची कार बंद पडली. यानंतर कार सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक भडका उडाला. या घटनेत कार मालकाचा हाेरपळून मृत्यू झाला, तर दाेघे जण बालंबाल बचावले.
तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे कार्यरत तर हैदराबाद येथे वास्तव्यास असणारे सरकारी शाळेवरील शिक्षक सुरेशकुमार पेंटलवल्ली (५७) व त्यांचे मित्र पुजारी विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम व चालक कार्तिक नागय्या कोंडा (दोघेही रा. व्यंकटेश्वरा कॉलनी, सरूरनगर, हैदराबाद) हे तिघे कारने (क्र. टीएस.०५-ईझेड.७८३९) शिर्डी येथे साई दर्शनासाठी गेले हाेते. दर्शन आटाेपून शनिवारी रात्री ते हैदराबादकडे परतत हाेते. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास ते उमरगा तालुक्यातील दाबका गावानजीक असलेल्या पेट्रोलपंपाजवळ पाेहाेचताच, कार अचानक बंद पडली.
पुजारी नारायणम व चालक काेंडा यांनी कार सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र, सुरू झाली नाही. शेवटी बंद कार ढकलत पेट्रोलपंपाच्या समाेर आणण्यात आली. यानंतरही जवळपास दीड ते दोन प्रयत्न केले. ताेवर पहाटेचे पाच वाजले. कार काही केल्या सुरू हाेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुजारी विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम हे पेट्रोल पंपावर मेकॅनिक भेटतो का? हे पाहण्यासाठी गेले, तर चालक काेंडा रस्त्यालगत बसलेले हाेते. याचदरम्यान शिक्षक पेंटलवल्ली यांनी कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, अचानक भडका उडाला. अवघ्या काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले असता, पेंटलवल्ली यांचा हाेरपळून मृत्यू झाला.
पेंटलवल्ली यांना बाहेर पडता आले नाही...
कारने अचानक पेट घेतल्यानंतर मित्र कार्तिकने शिक्षक पेंटलवल्ली यांना कारच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने राैद्र रूप धारण केल्याने त्यात यश आले नाही. आजूबाजूच्या लाेकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता, ताेवर पेंटलवल्ली यांचा हाेरपळून मृत्यू झाला.
मयताचे ‘डीएनए’ सॅम्पल घेतले
रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मयताचा मुलगा, तसेच नातेवाईक घटनास्थळी पाेहाेचले. पाेलिसांनी घडलेल्या प्रकाराची त्यांना माहिती दिली. यानंतर फाॅरेन्सिक टीमने कारची तपासणी केली, तसेच वैद्यकीय पथकाने मयताचे ‘डीएनए’ नमुने घेतले आहेत.
दाेन्ही अंगाने पाेलिसांकडून तपास
मयत शिक्षक सुरेशकुमार पेंटलवल्ली यांना कारने पेट घेतल्यानंतर दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही, असे मित्र कार्तिकने सांगितले असले तरी पाेलिस दाेन्ही अंगाने तपास करीत आहेत. कारने पेट घेतला तेव्हा नेमके हे दाेघेच बाहेर कसे हाेते? या प्रश्नाची पाेलिस उकल करीत आहेत.