उस्मानाबाद कारागृहात अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:00 IST2018-09-05T17:00:08+5:302018-09-05T17:00:50+5:30
अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.

उस्मानाबाद कारागृहात अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
उस्मानाबाद : अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कळंब पोलीस ठाण्यात योगेश उर्फ रूद्र शिवाजी शिंपले (वय-१८ रा़ चोंदे गल्ली, कळंब जि़उस्मानाबाद) याच्याविरूध्द अत्याचार प्रकरणी १५ मे रोजी गुन्हा दाखल होता़ पोलिसांनी योगेश शिंपले याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती़ त्यामुळे योगेश शिंपले याला उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात आज सकाळी नेहमीप्रमाणे सर्व कैद्यांना प्रात:विधी, अंघोळीसाठी सोडण्यात आले होते़ इतर कैदी प्रात:विधी, अंघोळ करून नाष्ट्यासाठी गेले होते़ मात्र, त्याच वेळी योगेश शिंपले याने कारागृहातील सांस्कृतिक हॉलमधील लोखंडी अँगलला टी शर्टने गळफस घेतला.
ही घटना समोर येताच कारागृहात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुख्य न्याय दंडाधिकारी पोटे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, सीआयडीचे डीवायएसपी चिंतले, पोनि तानाजी दराडे, पोउपनि दादासाहेब सिध्दे यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ मयताचे नातेवाईकही घटनास्थही हजर झाले होते़ पंचनाम्यानंतर मयताचे पार्थिव सोलापूर येथील रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़