आई राजा उदे-उदे! तुळजापुरात लाखो भाविकांची पायी हजेरी; सिंहासनावर देवीची पूर्व प्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:26 IST2025-10-07T18:25:07+5:302025-10-07T18:26:20+5:30
अश्विनी पौर्णिमा, आई राजा उदे-उदेच्या जयघोषाने तुळजापूरनगरी दुमदुमली

आई राजा उदे-उदे! तुळजापुरात लाखो भाविकांची पायी हजेरी; सिंहासनावर देवीची पूर्व प्रतिष्ठापना
- गोविंद खुरूद
तुळजापूर (जि. धाराशिव) : अश्विनी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी तुळजापुरात लाखो भाविकांनी पायी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यामध्ये सोलापूर आणि नळदुर्ग (कर्नाटक) रोडवरून येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती. येणारा तरुण वर्ग उत्साहाने ‘आई राजा उदे-उदे’चा जयघोष करत शहरात दाखल होत होता. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पर्यायी वाहनतळ खचाखच भरले होते, तर एसटी महामंडळाच्या जादा बसेसही अपुऱ्या ठरत होत्या.
मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता तुळजाभवानीची सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सोमय्याश्री यांच्या हस्ते शासकीय आरती झाली. त्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली. यावेळी भाविकांनी भंडाराची उधळण करत ‘जय भवानी’चा घोष केला. सकाळच्या विधीनंतर दुपारी तुळजाभवानीची विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. पुणे येथील भाविक किराड यांनी सिंहासनासह संपूर्ण गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता.
नवरात्रात पावसामुळे ठप्प झालेला व्यापार पुन्हा सुरू झाल्याने आणि परतीचे भाविक खरेदी करत असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ ची सांगता बुधवारी महाप्रसाद रूपी अन्नदानाने आणि सायंकाळी सोलापूर येथील शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्याने छबिन्यासह होईल. वाढत्या गर्दीमुळे शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.