'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:26 IST2025-09-26T19:25:54+5:302025-09-26T19:26:55+5:30
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे.

'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा!
- संतोष वीर
भूम (धाराशिव) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठी राहणाऱ्या शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या शेतात, गोठ्यात व घरात पाणी घुसल्याने शेतीसह पशुधन वाहून गेले, तर घरातले अन्नधान्य ही पाणी घरात शिरल्याने भिजून खराब झाले होते. या गंभीर परिस्थितीत नागरिकांपुढे खाण्या-पिण्याचे संकट उभे राहिले होते. यामुळे या संकटसमयी अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी एक हात मदतीचा पुढे करत दिलासा दिला.
यामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी मात्रे वाडीतील लक्ष्मण पवार या शेतकऱ्याने अतिवृष्टीमध्ये जमीन वाहून गेल्याने व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या विवेचनेतून व नुकसानीमुळे हताश होऊन आपले जीवन संपवले होते, त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बेलगाव व पिंपळगाव येथे अडीचशे बॉक्स पिण्याचे पाण्याचे, तसेच साडेसांघवी येथे ३५ खाण्यापिण्याच्या किट्स वाटप करून ग्रामस्थांना तातडीचा दिलासा दिला आहे.
याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रानबागुल यांनी परंडा तालुक्यातील देवगाव येथे ४०, माणकेश्वर येथे ४५, साडेसांगवी येथे ३५, तसेच नवलगाव येथे १५ किट्स खाण्यापिण्याच्या वाटप केल्या. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे जनावरे पुरात वाहून गेली आहेत, त्यांनाही त्यांनी आर्थिक मदत देत आधार दिला आहे.
दरम्यान, पिंपळगाव येथील शेतकरी आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील तब्बल १७ गायी पुराच्या प्रवाहात जागीच दगावल्या तर तर १० गायी वाहून गेल्या होत्या . या प्रचंड नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. याची दखल घेत राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी आमदार रोहित पवारांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यासोबतच उमेशराजे निंबाळकर यांनीही १० हजार रुपयांची मदत देऊन या कुटुंबाला आधार दिला आहे.
यामुळे पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे. नागरिकांनीही या मदत कार्याचे स्वागत केले असून, “संकटाच्या काळात मिळणारा हा हातभार खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे,” अशा भावना नुकसान ग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.