सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाची सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:20 IST2019-12-30T17:14:44+5:302019-12-30T17:20:03+5:30
पत्नी हॉस्पिटलमध्ये करते काम ..

सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाची सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
पुणे : सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाने पत्नी व तिच्या घरच्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली़. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी त्यांच्या पत्नी, सासू, सासरे, मेव्हणा, मेव्हणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. हडपसरमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून गेल्या महिन्याभरात तिघा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. सतीश बापू गायकवाड (वय २२, रा़ ससाणेनगर, काळेपडळ, हडपसर) असे या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी त्याची आई ज्योती गायकवाड (वय ५०, रा़ साडे, ता़ करमाळा, जि़ सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सतीश गायकवाड हा एका मेडिकल स्टोअर्समध्ये कामाला होता़. त्याचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता़. त्याची पत्नी एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करीत आहेत. पत्नी आपले ऐकत नाही. तसेच सासरे, सासु, मेव्हणा, मेव्हणी हे मानसिक त्रास देतात, या कारणाने सतीश गायकवाड याने २३ डिसेंबर रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीशच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्याभरात हडपसर परिसरातील तीन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पत्नी मानसिक त्रास देते़ तिचे व बाळाचे कपडे धुण्यास लावते म्हणून मगरपट्टा येथील तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर नोकरी सुटल्याने काहीही काम नाही. तसेच दारुच्या व्यसनाने एका तरुणाने आत्महत्या केली होती.