क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार

By जितेंद्र कालेकर | Updated: June 2, 2025 20:51 IST2025-06-02T20:51:34+5:302025-06-02T20:51:57+5:30

वाद मिटविल्यानंतरही पुन्हा वाद उफाळला, उपचाराच्या दरम्यान शिवम याचा सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला

Youth stabbed to death in Thane over cricket dispute; Accused absconding | क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार

क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार

जितेंद्र कालेकर 

ठाणे - क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टाेळक्याने दुसऱ्या गटातील शिवम कराेतिया (वय २०, रा.वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या पाठीच्या उजव्या भागावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, आराेपींचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी साेमवारी दिली.

वागळे इस्टेट, साठवाडी भागात २ जून राेजी सायंकाळी ५ वाजता साठेवाडीतील ज्ञानसाधना कॉलेजजवळ भावेश करोतीया (वय १६) हा तेथील मुलांसह रवी यांच्याबराेबर काॅलेजसमोरील रोडवर क्रिकेट खेळत हाेता. त्याचा रवि शर्मा (वय १९) या साठेवाडीतील तरुणाबराेबर खेळण्यासाठी वाद झाले. रवीने भावेशला मारहाणही केली. या वादानंतर भावेशने कुटुंबीयांच्या आग्रहावरून हा वाद मिटताही घेतला. वाद मिटल्यानंतर पुन्हा काॅलेजसमोर भावेश याचे दोन्ही भाऊ साहिल आणि शिवम, तसेच रवि शर्मा यांचा मित्र तनिष हेमेंद्र सिंग (रा.सर्व साठेवाडी, ठाणे) यांच्यात वाद झाला. या वादातून त्यांच्यात हाणामारीही झाली.

त्यामध्ये तनिषने त्याच्याकडील चाकूने शिवम याच्या उजव्या बाजूला पाठीमागे भाेसकला. यात गंभीर जखमी झालेल्या शिवम याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला हाजुरीतील महावीर जैन हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराच्या दरम्यान शिवम याचा सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. फरार झालेल्या आराेपींचा शाेध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: Youth stabbed to death in Thane over cricket dispute; Accused absconding