बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:54 IST2025-08-26T18:53:40+5:302025-08-26T18:54:29+5:30

मुलीच्या कुटुंबाने प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केली. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कपलने लग्न केलं होतं.

youth murdered after intercaste marriage in bhitarwar Gwalior | बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून ऑनर किलिंगची एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबाने प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केली. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कपलने लग्न केलं होतं. हाच राग मनात ठेवून जावयाची हत्या करण्यात आली. आता पोलिसांनी या प्रकरणात दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

बेलगढा पोलीस स्टेशन परिसरातील हरसी गावात ही धक्कादायक घटना घडली. ओमप्रकाश बाथमने सुमारे एक वर्षापूर्वी त्यांच्याच गावातील शिवानी झा या मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी डाबरा येथे राहू लागले. १९ ऑगस्ट रोजी ओमप्रकाश आणि त्यांची पत्नी शिवानी लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गावी परतले. पण हे परतणं त्यांच्यासाठी जीवघेणं ठरलं.

शिवानीचे वडील द्वारिका उर्फ ​​बंटी ओझा, भाऊ राजू झा, आई उमा आणि परिसरातील संदीप शर्मा यांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी क्रूर हल्ला केला. ओमप्रकाशला गंभीर जखमी अवस्थेत ग्वाल्हेरच्या जयआरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान सहा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. शिवानीने दिलेल्या माहितीनुसार, "माझे वडील, भाऊ आणि आई यांनी मिळून माझ्या पतीला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. माझ्या पतीची माझ्यासमोर हत्या करण्यात आली. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."

ओमप्रकाश बाथमच्या आईनेही न्यायाची मागणी केली आणि म्हणाली, "माझ्या मुलाने केवळ त्याच्या पसंतीने लग्न केले म्हणून त्याची हत्या करण्यात आली. माझ्या मुलाला मारणाऱ्यांना फाशी देण्यात यावी." पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत मुख्य आरोपी वडील द्वारिका उर्फ ​​बंटी ओझा आणि भाऊ राजू झा यांना अटक केली. इतरांचा शोध घेत आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: youth murdered after intercaste marriage in bhitarwar Gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.