नशेत डंपर चालवणाऱ्या तरुणाची पोलिस बीट चौकीसह वाहनांना धडक; पोलिसांचा गोळीबार, आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:56 IST2023-05-31T15:55:36+5:302023-05-31T15:56:21+5:30
ही घटना न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

नशेत डंपर चालवणाऱ्या तरुणाची पोलिस बीट चौकीसह वाहनांना धडक; पोलिसांचा गोळीबार, आरोपी ताब्यात
उरण - दारुच्या नशेत डंपर चालविणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने उलवा सेक्टर १०-ब मधील कंटेनरमध्ये असलेल्या पोलीस बीट चौकीला आणि एका सोसायटी समोर उभ्या असलेल्या ४-५ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. नशेत असलेला आरोपीकडून आणखी नुकसान टाळण्यासाठी आणि आरोपीला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांनी मोनीष घरत (२३) रा- उलवा याला ताब्यात घेतल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी आरोपीचे लग्न झाले आहे. मंगळवारी घरच्यांशी झालेल्या भांडणानंतर दारुच्या नशेत असलेला मोनीष घराबाहेर पडला होता. सोसायटीच्या बाहेर असलेला डंपर सुरू करुन तो वाट दिसेल त्या मार्गाने निघाला होता.
नशेत असल्याने त्याने सोसायटी समोरच असलेल्या ४-५ वाहनांना धडक दिली. यानंतर आरोपींने टाटा कन्सल्टन्सी जवळील कंटेनरमध्ये असलेल्या बीट चौकीलाही धडक दिली. आरोपीला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या घटनेत कुणीलाही इजा झाली नाही. मात्र ४-५ वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.