मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कुटुंबीयांना कळवून तरुण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:06 IST2018-10-25T20:05:33+5:302018-10-25T20:06:06+5:30
जगदीश दलाराम परिहार (वय 23) असं या बेपत्ता तरुणाचे नाव असून तो मुलुंडच्या मुलुंड कॉलनी परिसरात रहातो. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कुटुंबीयांना कळवून तरुण बेपत्ता
मुंबई - मुलुंड येथील एक 23 वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता झाला आहे. मला हिंदू धर्म आवडत नाही मी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे असे फोनवर शेवटचे कुटुंबियांना कळवून हा तरुण बेपत्ता झाला आहे. हा तरुण पाकिस्तान अथवा आखाती देशात पळून गेल्याच्या शक्यतेने सध्या खळबळ उडाली आहे. जगदीश दलाराम परिहार(वय 23) असं या बेपत्ता तरुणाचे नाव असून तो मुलुंडच्या मुलुंड कॉलनी परिसरात रहातो. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जगदीश हनीट्रॅपने पाकिस्तान येथे पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकत आहे. परंतु गेले वर्षभर तो फेसबुकवरून एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबाने वारंवार त्याला सावध केले होते. मात्र, तरी देखील तो पाकिस्तानी तरुणीच्या फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगदीश संपर्कात होता. दोन दिवसांपासून त्याने त्याच्या बँक अकाउंटमधून काही रक्कम देखील काढली होती. नंतर मंगळपासून तो बेपत्ता झाला आहे. त्याचे शेवटचे मोबाईल टॉवर लोकेशन हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याचे समजते. तो मुंबई विद्यापीठात T.Y.B.COM साठी काही अर्ज भरण्यास जात असल्याचे सांगून घरातून मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास निघाला. त्यानंतर त्याने त्याचा भाऊ भावेशला शेवटचा फोन केला आणि मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला असून मला संपर्क करू नका असे सांगून फोन बंद करून ठेवला आहे. जगदीशने सोबत स्वतःचे सर्व कागदपत्र आणि आवश्यक साहित्य देखील नेले आहे. वडिलांच्या चष्मा विक्रीच्या दुकानातच जगदीश कॉम्प्युटरचा जास्त वापर करायचा. त्याने हे टोकाचे पाऊल कसे आणि का? उचलले याचा पोलीस शोध घेत आहे. सध्या मुलुंड पोलिसांसह दहशत विरोधी पथक (एटीएस) देखील या घटनेचा तपास करीत आहेत. या प्रकरणात इतर देशातील काही संघटनाचा काही हात आहे का? फेसबुकवरील ती तरुणी कोण आहे? या सर्व बाजूने पोलीस तपास करीत आहेत. सध्या जगदीशने स्वतः चे फेसबुक अकाउंट डिलीट केल्याने पोलिसांना या तपासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या तरुणाचा बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला पाकिस्तानचा संदर्भ असल्याने त्याची संवेदनशीलता वाढली आहे.