इंजेक्शन देताच युवकाचा मृत्यू, संतप्त नातलगांकडून रूग्णालयात तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:02 IST2021-01-18T18:01:00+5:302021-01-18T18:02:59+5:30
Crime News : अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी दुपारी तो नृसिंह व्यायामशाळेलगत असलेल्या डॉ.पद्माकर मत्ते यांच्या खासगी दवाखान्यात गेला.

इंजेक्शन देताच युवकाचा मृत्यू, संतप्त नातलगांकडून रूग्णालयात तोडफोड
वणी (यवतमाळ) : डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. आकाश हनुमान पेंदोर असे मृताचे नाव आहे. अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी दुपारी तो नृसिंह व्यायामशाळेलगत असलेल्या डॉ.पद्माकर मत्ते यांच्या खासगी दवाखान्यात गेला.
डॉ.मत्ते यांनी त्याची तपासणी करून त्याला इंजेक्शन व काही गोळ्या दिल्या. त्यानंतर आकाश घरी निघुन गेला. मात्र काही वेळताच, त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातलगांनी दवाखान्यात शिरून तोडफोड केली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर मृताचे नातेवाईक ठाण्यात पोहोचले. तेथे डॉ.मत्ते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.