That young woman victim of casting couch three arrested including casting director, CIU action | ‘त्या’ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार, कास्टिंग डायरेक्टरसह तिघांना अटक, सीआययूची कारवाई

‘त्या’ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार, कास्टिंग डायरेक्टरसह तिघांना अटक, सीआययूची कारवाई

मुंबई: जुहूच्या रामाडा प्लाझा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून सुटका केलेल्या ८ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार ठरल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. त्यांना सिनेमात काम देण्याच्या नावाखाली यात ढकलण्यात आले होते. याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर संदीप दशरथ इंगळेसह तिघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यभरात कास्टिंग डायरेक्टर, तसेच चित्रपट निर्माता असलेला संदीप हा प्रेम या नावाने विविध नवोदित कलाकार, तसेच मॉडेल्सना वेश्या व्यवसायात ढकलत होता. यात काही तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. यात अडकणाऱ्या मॉडेल्सना ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेतील काही भाग देऊन उर्वरित रक्कम तो स्वतःसाठी खर्च करीत होता.

याबाबत माहिती मिळताच, सीआययूचे प्रमुख सचिन वाझे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोगस ग्राहक पाठवून आरोपींसोबत संवाद साधला. वेश्या, दलाल यांनी त्यांना व्हॉट्सॲपवर मॉडेल्स मुलींचे फोटो पाठविले आणि मुलींना जुहू चौपाटीजवळील रामडा इन पाम ग्रोव येथे घेऊन येत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे येथील हॉटेलमध्ये ९ रूम बुक करून मुलींना बोगस ग्राहकांसोबत पाठविण्यात आले. त्यानुसार पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता छापा टाकून ही कारवाई केली.

या कारवाईत मुलींसाठी पथकाने संदीपच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले होते. या छापा कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५९ हजार रुपयांची रोकड आणि १५ स्मार्टफोन, तसेच कार जप्त केली. यात संदीपसह तान्या योगेश शर्मा (३१), हनुफा मुजाहीद सरदार ऊर्फ तानिया (२६) यांना बुधवारी अटक केली. यात सुटका केलेल्या ८ तरुणींनी विविध चित्रपट, वेबसिरीजसह जाहिरातींमध्ये मॉडेल्स म्हणून काम केले आहे. त्यांना मॉडेल्स, अभिनेत्री म्हणून चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: That young woman victim of casting couch three arrested including casting director, CIU action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.