"तू माझ्याकडे काय पाहतोय, तुला माहित्येय का मी कोण आहे"; तरूणाच्या डोक्यात कोयता मारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 11:54 IST2021-06-05T11:54:15+5:302021-06-05T11:54:31+5:30

किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात मारला कोयता, आरोपी कुणाल कदम उर्फ चिक्या, दाद्या कदम व इतर दोन इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

The young man was stabbed in the head in Pimpari chinchwad | "तू माझ्याकडे काय पाहतोय, तुला माहित्येय का मी कोण आहे"; तरूणाच्या डोक्यात कोयता मारला 

"तू माझ्याकडे काय पाहतोय, तुला माहित्येय का मी कोण आहे"; तरूणाच्या डोक्यात कोयता मारला 

पिंपरी : तू माझ्याकडे का पाहात आहेस, मी कोण आहे तुला माहित नाही का, असे म्हणत तरुणाला मारहाण केली. तसेच लोखंडी कोयता डोक्यात मारून गंभीर जखमी केले. बौद्धनगर, पिंपरी येथे गुरुवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

ऋषिकेश गणेश बालगुडे (वय २१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश राम (वय २१), कुणाल कदम (वय २३), दाद्या दीपक कदम (वय २१, तिघेही रा. बौद्धनगर पिंपरी) व इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध नगर पिंपरी येथे फिर्यादीचा मित्र शहबाज शेख हा दुकानात खरेदी करीत असताना फिर्यादी दुकानाच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी गणेश राम तेथे आला. तू माझ्याकडे का पाहत आहेस, मी कोण आहे तुला माहित नाही का, असे आरोपी गणेश राम म्हणाला. त्याच्या सोबत असलेले आरोपी कुणाल कदम उर्फ चिक्या, दाद्या कदम व इतर दोन इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी गणेश राम याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

Web Title: The young man was stabbed in the head in Pimpari chinchwad

टॅग्स :Policeपोलिस