Young boy committed suicide after facebook friend forcing for marriage | फेसबूक फ्रेंडने लग्नासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या
फेसबूक फ्रेंडने लग्नासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्देआकाशचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका महिलेसोबत फेसबूकवर प्रेमसंबंध जुळले.२६ ऑक्टोबरला ती महिला गावात आली आणि तिने आकाशशी वाद घालून परत गेली. विलासनगर रोडवरील चीअर्स बारसमोर त्यांनी लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली.

अमरावती - फेसबूक फ्रेंडने लग्नासाठी दबाव टाकल्याने एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीत उघडकीस आली. आकाश हरिदास गवई (२५, रा. बेलोरा हिरापूर, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

कोतवाली पोलिसांना २८ ऑक्टोबर रोजी वालकट कम्पाऊंड येथील एका खासगी रुग्णालयातून आकाश गवई नामक तरुणाने विष प्राशन केल्याच्या माहितीचा मेमो प्राप्त झाला होता. आकाशचा उपचारादरम्यान २८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासादरम्यान आकाशला त्याचा चुलतभाऊ प्रतीक अनंत गवई याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी प्रतीकचे बयाण नोंदविले असता, त्याने आकाशच्या विष प्राशनाचे कारण बयाणात सांगितले.

आकाशचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका महिलेसोबत फेसबूकवर प्रेमसंबंध जुळले. ती महिला आकाशकडे लग्नासाठी दबाव टाकून त्याला त्रास देत होती. २६ ऑक्टोबरला ती महिला गावात आली आणि तिने आकाशशी वाद घालून परत गेली. त्यानंतर आकाश हा प्रतीक व दर्शन सवई यांच्यासोबत दुचाकीवर बसून रमाबाई आंबेडकरनगरातील बहिणीकडे निघाले. यादरम्यान विलासनगर रोडवरील चीअर्स बारसमोर त्यांनी लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली. त्यावेळी आकाशाने जवळील विषाची बॉटल काढून विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब लक्षात येताच प्रतीकने आकाशला इर्विन रुग्णालयात नेले. तेथून त्याला झेनिथ हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे प्रतीकने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. यावरून पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तोकलवाड करीत आहेत.

Web Title: Young boy committed suicide after facebook friend forcing for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.