'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:49 IST2025-09-24T11:47:38+5:302025-09-24T11:49:11+5:30
एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली. केवळ एवढंच नाही, तर तिला वाचवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवरही त्याने जीवघेणा हल्ला केला.

AI Generated Image
पश्चिम दिल्लीच्या ख्याला परिसरात मंगळवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथे एका तरुणाने आपल्या दूरच्या बहिणीची चाकूने वार करून हत्या केली. केवळ एवढंच नाही, तर तिला वाचवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवरही त्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
सकाळी ८ वाजताच्या सुमारास ख्याला येथील जेजे कॉलनीमध्ये नुसरत या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासात नुसरतचा दूरचा भाऊ इस्तेखार अहमद उर्फ बब्बू यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.
या हल्ल्यात नुसरतचा जागीच मृत्यू झाला. नुसरतची मुलगी सानिया आणि तिची जाव अकबरी या तिला वाचवण्यासाठी धावल्या, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात सानियाची बोटे कापली गेली, तर अकबरीच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बायकोला पळून जाण्यात मदत केल्याचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इस्तेखार अहमदला संशय होता की त्याची दूरची बहीण नुसरतनेच त्याच्या पत्नीला पळवून लावले. या संशयामुळेच संतापलेल्या इस्तेखारने नुसरतची हत्या केल्याची कबुली दिली.
इस्तेखारने एका टिफिन बॉक्समध्ये चाकू लपवून आणला होता. तो सकाळी ७ वाजता नुसरतच्या घरी पोहोचला. नुसरत झोपेतून उठल्यावर त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. यानंतर ती त्याच्यासाठी चहा आणायला गेली असता इस्तेखारने तिच्यावर चाकूने वार केले.
हत्येमागचे खरे कारण काय?
इस्तेखारचा विवाह यास्मिन नावाच्या महिलेशी झाला होता, त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, इस्तेखार काहीच कामधंदा करत नव्हता. या गोष्टीला कंटाळून यास्मिनने ही बाब इस्तेखारची बहीण नुसरतला सांगितली. नुसरतने इस्तेखारला अनेकदा समजावून सांगितले, पण त्याच्यात काहीच सुधारणा झाला नाही. यामुळे दीड वर्षांपूर्वी नुसरतने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीसोबत यास्मिनचे लग्न लावून दिले. त्यानंतर यास्मिन इस्तेखारला सोडून निघून गेली. याच गोष्टीचा राग मनात धरून इस्तेखारने नुसरतची हत्या करण्याचा कट रचला.