'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:36 IST2025-08-29T13:34:33+5:302025-08-29T13:36:37+5:30
Husband Wife Crime News: पतीने लग्नात हुंडा घेतला, तरी पैशांच्या हव्यास थांबला नाही. वारंवार माहेरावरून पैसे आणण्याच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय शिल्पाने शेवटी आयुष्य संपवलं.

'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
27 Year Old Married woman ends life: शिल्पा आणि प्रवीणचे लग्न झाले. दोघे सॉफ्टवेअर इंजिनिअर. लग्नात शिल्पाच्या घरच्यांनी १५ लाख, १५ तोळे सोनं दिलं. त्यानंतरही प्रवीणची आणि त्याच्या कुटुंबाची पैशाची लालसा संपली नाही. त्यांनी पुन्हा ५ लाख मागितले शिल्पाच्या वडिलांनी दिले. पण, त्यानंतरही पती आणि सासरच्या लोकांकडून छळ सुरूच राहिला आणि शिल्पाने सहा महिन्याच्या चिमुकल्याचा विचार न करता गळफास घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना कर्नाटकातील दक्षिण बंगळुरूतील सुड्डागुंटेपाल्या येथे घडली आहे. मंगळवारी रात्री २७ वर्षीय शिल्पाचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शिल्पाच्या आईवडिलांनी हुंड्यासाठी छळ केला जात होता, असा आरोप केला असून, पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
अडीच वर्षापूर्वी लग्न, सहा महिन्यांचा मुलगा
शिल्पाचे प्रवीणसोबत अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. शिल्पा इन्फोसिसमध्ये काम करत होती. लग्नानंतर तिने नोकरी सोडली. प्रवीण ओरॅकलमध्ये नोकरी करत होता. त्यांना एक मूल झालं. ते सहा महिन्यांचं आहे.
व्यवसाय सुरू केला अन्...
प्रवीणने लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर नोकरी सोडली. फूड बिझनेस सुरू केला. त्यासाठी त्याने पाच लाख रुपये शिल्पाला माहेरावरून आणायला सांगितले. तिच्या वडिलांनीही दिले. पण, त्यानंतरही शिल्पाचा पती आणि सासरच्यांकडून छळ सुरूच राहिला.
शिल्पाचे आईवडिल म्हणाले, तिला काळी असल्याचे म्हणून टोमणे मारायचे. शिल्पाची सासू म्हणायची 'तू काळी आहेस आणि माझ्या मुलासोबत अजिबात चांगली दिसत नाहीस. त्याला सोडून दे. आम्ही त्यांच्यासाठी चांगली मुलगी शोधू.'
लग्नात शिल्पाच्या वडिलांनी दिले १५ लाख, १५ तोळे सोनं
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत शिल्पाच्या आईवडिलांनी सांगितले आहे की, 'प्रवीणच्या कुटुंबीयांनी लग्नावेळी १५ लाख रुपये रोख आणि १५ तोळे सोने आणि घरात वापरायचे साहित्यही मागितले. आम्ही ते सगळे दिले. त्यानंतरही त्यांच्याकडून पैसे मागितले गेले. आम्ही दिले. हुंड्यावरून वारंवार तिला टोमणे मारले जात होते.
पोलिसांनी शिल्पाचा पती प्रवीणला केलं अटक
प्रवीणने व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये मागितले होते. आम्ही पैसे दिले. पण, तरीही शिल्पाचा छळ सुरूच होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केली. पोलिसांनी तक्रारीवरून हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रवीणला अटक केली असून, तपास करत आहेत.