कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:13 IST2025-10-29T13:12:24+5:302025-10-29T13:13:27+5:30
महिलांना कमी भाड्याचे आमिष दाखवून टॅक्सीत बसवून त्यांच्यासोबत लूटमार करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

AI Generated Image
राजस्थानच्या जोधपूर शहरात महिलांना कमी भाड्याचे आमिष दाखवून टॅक्सीत बसवून त्यांच्यासोबत लूटमार करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोन महिलांसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यांमध्ये वापरलेली बिना नंबरची टॅक्सी आणि चोरी केलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अत्यंत शिताफीने महिलांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
स्वस्त भाड्याचे आमिष दाखवून करायचे शिकार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले हे आरोपी गुजरात राज्यातील खेडा आणि मेहसाणा जिल्ह्यांतले आहेत. हे आरोपी गुजरातहून एक बिना नंबरची टॅक्सी घेऊन निघायचे आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये महिलांना गंडा घालायचे. जोधपूर शहरात त्यांनी कायलाना रोड, सूरसागर रोड, मसूरिया रोड अशा पाच ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. एकूण १० हून अधिक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
भांडण्याचे नाटक करायचे अन्...
२७ ऑक्टोबर रोजी भदवासिया येथील ६५ वर्षीय आशा देवी महामंदिर चौकातून घरी जाण्यासाठी एका टॅक्सीत बसल्या होत्या. टॅक्सी चालकाने त्यांना कमी भाड्याचे आमिष दाखवले होते. आशा देवींच्या म्हणण्यानुसार, चालक त्यांना वेगळ्या मार्गाने घेऊन जाऊ लागला. त्यांनी आक्षेप घेतला असता, चालकाने त्यांना मध्येच रस्त्यावर उतरवले आणि 'मी दोन मिनिटांत येतो' असे सांगून निघून गेला. याचवेळी टॅक्सीत बसलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाने आपापसात भांडणाचे नाटक सुरू केले. याच गोंधळाचा फायदा घेऊन, त्यांनी आशा देवी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि तेथून पळून गेले.
पोलिसांना असा द्यायचे चकमा
तपासाअंती पोलिसांनी गुजरातच्या खेडा येथील मंसूरी जफर भाई (२८), भीमा भाई वादरी (३०), तसेच मेहसाणा येथील गोमती (५०) आणि पारू (३०) यांना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ते टॅक्सीवर रामदेवरा यात्रेचे प्रतीक असलेली बाबाची पताका लावत असत. त्यामुळे पोलीस तपासणी करताना त्यांना यात्रेकरू समजून सोडून देत असत. याच ट्रिकचा फायदा घेऊन ते राजस्थानभर बिनदिक्कतपणे चोऱ्या करत होते.
चोरी करण्याची खास पद्धत
या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. गळ्यामध्ये सोनसाखळी असलेल्या महिलांना हेरून चालक अर्धे भाडे घेण्याचे आमिष दाखवत असे. टॅक्सीत आधीच बसलेल्या महिला आरोपी गप्पांमध्ये गुंतवून प्रवाशांना सहज आणि सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करत. थोड्या अंतरावर गेल्यावर पुरुष आरोपी टॅक्सीत चढत असे आणि योग्य संधी साधून कटरच्या साहाय्याने चेन कापत असे. लूट झाल्यावर चालक पोलीस चेकिंगचे कारण सांगून पीडितेला मध्येच उतरवून टॅक्सी घेऊन पळून जात असे.
पोलिसांनी यातील एका आरोपीला पब्लिक पार्कमधून, तर उर्वरित तिघांना त्रिपोलिया बाजारातून खरेदी करताना अटक केली. अटक केलेल्या दोन महिला आरोपींना कोर्टाने जेलमध्ये पाठवले असून, दोन पुरुष आरोपींना दोन दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेण्यात आले आहे. या रिमांडमध्ये इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.